ड्रग्ज कनेक्शनबाबत बॅालीवूडचा "खिलाडी" अक्षय कुमारनं मैान सोडलं...  - Regarding drug connections  Akshay Kumar said Dont discredit Bollywood at all  | Politics Marathi News - Sarkarnama

ड्रग्ज कनेक्शनबाबत बॅालीवूडचा "खिलाडी" अक्षय कुमारनं मैान सोडलं... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

अन्य इंड्रस्ट्रीप्रमाणे आमच्या इंड्रस्ट्रीतील काही जण याच्याशी संबधीत आहेत. पण त्यामुळे सगळ्याचं बॅालीवुडला बदनाम करू नका.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात गेल्या अनेक दिवसापासून ड्रग्ज कनेक्शनबाबत बॅालीवुड कलाकाराचं नाव समोर येत आहे. याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप केले जातात. आता बॅालीवुडच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत बॅालीवुडचा "खिलाडी" अक्षय कुमार यानं मैान सोडलं आहे. याबाबत अक्षयनं पहिल्यादाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या व्हिडिओला अनेक कलाकारांनी लाइक केलं असून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

अक्षय कुमारनं व्हिडओ शेअर करून आपलं मत व्यक्त केलं आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय म्हणतो की खूप दिवसांपासून माझ्या मनात एक गोष्ट येत होती. पण मला कळत नव्हतं की काय बोलू, कोणाशी बोलू, आज विचार केला की तुम्हा सगळ्यांशी ती गोष्ट शेअर करायला हवी.

आज खूप जड अंतकरणानं एक गोष्ट तुमच्याशी शेअर करीत आहे. सगळीकडे नकारात्मक परिस्थिती असल्यामुळे कुणाशी आपल्या भावना व्यक्त कराव्यात हे कळत नव्हतं. आम्ही कलावंत जरी असलो तरी आपण सर्वांनी खूप प्रेमानं या बॅालीवुडला बनविलं आहे. आज तुमच्या मनात आमच्याविषयी राग आहे. सुशांतच्या आत्महत्येनं अनेक बाबी समोर आल्यात. त्यानंतर सगळेच दुःखी झाले. या घटनेनंतर आम्हाला आमच्या आत डोकावणं गरजेचं ठरलं. बॅालीवुडबाबत अनेक बाबींविषयी आम्हास विचार करण्यास भाग पाडलं. 

ड्रग्जबाबत अनेक गोष्टी आम्हाला मान्य कराव्यात लागतील. याबाबत मी खोटं बोलणार नाही. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे अन्य इंड्रस्ट्रीप्रमाणे आमच्या इंड्रस्ट्रीतील काही जण याच्याशी संबधीत आहेत. पण त्यामुळे सगळ्याचं बॅालीवुडला बदनाम करू नका.

प्रशासन याप्रकरणी तपासात जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. आम्ही प्रशासनाला सहकार्य करू. माध्यमांनी या विषयी नक्कीच आवाज उठवावा. पण हा विषय संवेदनशीलपणे हाताळावा. कारण तुमच्या एका नकारात्मक बातमीमुळं एखाद्या कलाकारांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. तुम्ही आमच्यावर जर नाराज असाल, तर आम्ही अजून मेहनत घेऊ तुमचा विश्वास प्राप्त करू, तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या, असं अक्षय कुमारनं म्हटलं आहे. 

सुशांतची हत्या नसून आत्महत्याच
 अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) त्याच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. या तपासात सीबीआयला सक्त वसुली संचालनालय (ईडी) आणि अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) मदत करीत आहेत. सीबीआयने अखेर सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला आहे. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचली आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख