पासवान यांच्यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात आठवलेच उरले 'असे' एकमेव मंत्री

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील बिगरभाजप एक मंत्री कमी झाला आहे.
ramdas athawale is sole representative of nda allies in union cabinet
ramdas athawale is sole representative of nda allies in union cabinet

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील घटक पक्षांच्या मंत्र्यांची संख्या आता एकावर आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एकेक घटक पक्ष बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील घटक पक्षांचा टक्का नगण्य झाला आहे. आता रिपब्लिकन पक्षाचे नेते व सामाजिक न्याय राज्यमंत्री हेच एकमेव घटक पक्षांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात उरले आहेत. 

महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळी शिवसेना नेते व तत्कालीन केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता. अरविंद सावंत हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार होता. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा करीत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. यामुळे अनेक वर्षे एनडीएत असलेली शिवसेना अखेर बाहेर पडली होती. 

यानंतर एनडीएमधील घटक पक्षांमधील शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरतकौर बादल आणि लोक जनशक्ती पक्षाचे पासवान हे दोघेच कॅबिनेट मंत्री होते. कृषी कायद्यांना विरोध करीत अकाली दल एनडीएमधून बाहेर पडले असून, हरसिमरतकौर यांनी राजीनामा दिला आहे. आता पासवान यांच्या निधनाने कॅबिनेटमधील घटक पक्षांचे प्रतिनिधित्व संपुष्टात आले आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात आता एकटे आठवलेच राज्यमंत्री म्हणून घटक पक्षांचे प्रतिनिधित्व करीत आहे. 

एनडीएतील घटक पक्ष असलेल्या नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केंद्रीय मंत्रिमंडळातील वाटा नाकारला होता. कारण त्यांना त्यावेळी एकच केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले होते. लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सहकारी पक्षांना मंत्रिमंडळात जास्त प्रतिनिधित्व देण्यास भाजपने नकार दिला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला 57 मंत्री होते. यात 24 कॅबिनेट, 9 स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि 24 राज्यमंत्री होते. 

सावंत आणि बादल यांचा राजीनामा तसेच, पासवान यांचे निधन यामुळे कॅबिनेट मंत्र्यांची संख्या 21 वर आली आहे. याचबरोबर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यमंत्र्यांची संख्याही 23 वर आली आहे. घटनेनुसार, मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण जागांच्या 15 टक्के असावी लागते. त्यापेक्षा जास्त मंत्री नेमता येत नाहीत. या निकषानुसार मोदींच्या मंत्रिमंडळात 80 मंत्री असायला हवेत. मात्र, मोदींच्या मंत्रिमंडळात जवळपास निम्मेच मंत्री आहेत. त्यामुळे आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com