पासवान यांच्या मृत्यूनंतरही राजकारण...मुलगी अन् जावयाला विमानतळावर रोखले - ram vilas paswans daughter and son in law protest at patna airport | Politics Marathi News - Sarkarnama

पासवान यांच्या मृत्यूनंतरही राजकारण...मुलगी अन् जावयाला विमानतळावर रोखले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले असून, त्यांचे पार्थिव पाटणा विमानतळावर आणण्यात आल्यानंतर मोठे नाट्य रंगले. 

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा व केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे काल निधन झाले. आज त्यांचे पार्थिव विमानाने पाटण्याला आणण्यात आले. या वेळी त्यांची मुलगी आणि जावयालाच विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे त्यांनी विमानतळावरच ठिय्या देत आंदोलन केले. यामुळे पासवान यांच्या मृत्यूवरुनही सरकारकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

पासवान यांची मुलगी आशा देवी आणि जावई अनिल साधू हे पासवान यांचे पार्थिव स्वीकारण्यासाठी पाटणा विमानतळावर गेले होते. त्यांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला. विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या या दांपत्याने तेथेच ठिय्या धरला. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे तेथे आल्यानंतर या दांपत्याने त्यांच्या मोटारीसमोरही काही काळ आंदोलन केले. 

आशा देवी यांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले. जिल्हा प्रशासनानेच विमानतळाच्या आतमध्ये जाऊ दिले नाही, असा दावा त्यांनी केला. अनिल साधू हे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी निगडित आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, अशा दु:खाच्या प्रसंगी राजकारण का केले जात आहे? पासवान यांची मुलगी आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळाच्या आतमध्ये प्रवेश का दिला जात नाही? 

मुख्यमंत्री नितीशकुमार हेही पासवान यांचे पार्थिव स्वीकारण्यासाठी विमानतळावर आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेचा विचार करुन केवळ काहीच व्यक्तींना विमानतळात जाण्यास परवानगी देण्यात आली होती. 

आशा देवी या पासवान आणि त्यांची पहिली पत्नी राजकुमारी देवी यांच्या कन्या आहेत. आशा देवी आणि त्यांची बहीण उषा देवी या पासवान यांच्या खगरिया जिल्ह्यातील सहरबन्नी या मूळगावी राहतात. पासवान यांनी नंतर रीना शर्मा यांच्याशी विवाह केला होता. त्यांना मुलगा चिराग आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. आज विमानतळावर घडलेल्या घटनेतून त्यांच्या कुटुंबातील मतभेद समोर आले आहेत. 

रामविलास पासवान (वय 74) यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर फोर्टिस एर्स्कॉर्ट्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यांचे मूत्रपिंडही निकामी झाले होते. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र चिराग हे चालवत आहेत. 

पासवान यांना ऑगस्टमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची 2017 मध्ये हृदय शस्त्रक्रिया झाली होती. लंडनमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयातील सदोष व्हॉल्व हा दुसरे उपकरण बसवून दुरुस्त करण्यात आला होता. याचबरोबर आधी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख