मोदींच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांची माघार नाहीच!

तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं आहे.
मोदींच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांची माघार नाहीच!
Farmers ProtestSarkarnama

नवी दिल्ली : वादग्रस्त तीन कृषी कायदे (3 Farm Laws) मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी सकाळी केली. शेतकऱ्यांनी आता आपल्या घरी जावे, शेतात जावे, असे आवाहन मोदींनी यावेळी केली. येत्या हिवाळी अधिवेशनात कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मोदींनी सांगितले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकरीही आंदोलन मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

दिल्लीच्या सीमांवर मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. येथील शेतकऱ्यांनी मोदींच्या घोषणेनंतर आनंद व्यक्त केला. पण आंदोलन आत्ताच मागे न घेण्याच घोषणाही करण्यात आली. महिनाअखेर सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात संसदेत कायदे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिवसापर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Farmers Protest
कमी पडल्याची कबुली देत पंतप्रधान मोदींनी मागितली देशाची माफी

संयुक्त किसान मोर्चाचा सरकारवर अजिबात विश्वास नसल्याचे यातून दिसून आले आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लगेचच आम्ही तत्काळ आंदोलन मागे घेणार नाही, असे ट्विट करत भूमिका स्पष्ट केली. संयुक्त किसान मोर्चा ने याला दुजोरा दिला. माध्यमांशी बोलताना टिकैत म्हणाले, शेतकऱ्यांचा केवळ पंतप्रधानांच्या उक्तीवर विश्वास नसून संसदेतील कृती महत्त्वाची आहे. कायदे मागे घेण्याबरोबरच एम एस पी म्हणजे हमीभावावरील कायदा करण्याबाबत सरकार काय करणार आहे याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष राहील, असे सांगत टिकैत यांनी सरकारशी लढा सुरूच राहील, असे संकेतही दिले.

देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे (Agriculture Acts) मागे घेण्याची मोठी घोषणा केली. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. या उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळाली, उत्पादनाची योग्य किंमत, पर्याय मिळावेत. अनेक वर्षांपासून ही मागणी होती. आधीही अऩेक सरकारांनी यावर मंथन केले होते. यावेळीही संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशातील कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गरीबांच्या उज्वल भविष्यासाठी सत्यनिष्ठेने, शेतकऱ्यांप्रति पूर्ण समर्पणभावनेतून प्रामाणिकपणे हे कायदे सरकारने आणले होते. पण एवढी पवित्र गोष्ट, पूर्णरुपाने शुध्द, शेतकऱ्यांच्या हिताची बाब आम्ही आमच्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. शेतकऱ्यांचा एकच वर्ग याला विरोध करत होता. पण तरीही हे आमच्यासाठी महत्वाचे होते. कृषी अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, प्रगतीशील शेतकऱ्यांनीही कृषी कायदेचे महत्व समजावून सांगण्याचे खूप प्रयत्नही केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in