दोनशे पोलिस हद्दीत घुसले होते...ते नशीबवान, पुन्हा आले तर सगळ्यांना मारू!

गोळीबारात मुळचे बारामतीचे असलेले व सध्या आसाममध्ये पोलिस अधिक्षक पदावरील वैभव निंबाळकर यांनाही गोळी लागली आहे.
Rajya Sabha MP Vanlalvenas controvercial comment on Assam Issue
Rajya Sabha MP Vanlalvenas controvercial comment on Assam Issue

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेला दोन्ही राज्यांमधील वाद आता आणखी वाढला आहे. मिझोराममधील एका खासदाराच्या वादग्रस्त वक्तव्यानं त्यात आणखी भर पडली आहे. आसामचे पोलिस पुन्हा हद्दीत घुसले तर सगळ्यांना मारू, असं ते म्हणाले आहेत. (Rajya Sabha MP Vanlalvenas controvercial comment on Assam Issue)

आसाम व मिझोरामच्या सिमेवर दोन दिवसांपूर्वीच जोरदार धुमश्चक्री झाली. गोळीबार व दगडफेकीमध्ये आसामच्या पाच पोलिसांचा मृत्यू झाला. या गोळीबारात मुळचे बारामतीचे असलेले व सध्या आसाममध्ये पोलिस अधिक्षक पदावरील वैभव निंबाळकर यांनाही गोळी लागली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मिझोराम पोलिसांवर ठपका ठेवला आहे. मिझोराम पोलिसांनीच गोळीबार घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा वाद वाढलेला असतानाच मिझोरामधील राज्यसभेचे खासदार के. व्हेनलालवेना यांनी गंभीर स्वरूपाचं वक्तव्य केलं आहे. 

एका वृतसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'आसामचे 200 हून अधिक पोलिस मिझोरामच्या हद्दीत घुसले होते. ते मिझोराम पोलिसांना आपल्यास पोस्टपासून मागे सारत होते. आसाम पोलिसांनी पहिल्यांदा गोळीबाराचे आदेश दिले. ते नशीबवान आहेत आम्ही त्या सगळ्यांना मारले नाही. पण ते पुन्हा आले तर आम्ही सगळ्यांना मारू,' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्यावर थेट आरोप केला आहे. गोळीबार सुरू असताना त्यांना सहावेळा फोन केला. पण ते केवळ 'सॉरी' म्हणाले आणि मला चर्चेसाठी ऐजवाल येथे बोलावले, असा दावा सरमा यांनी केला आहे. आमची एक इंच जमीनही कोणी घेऊ शकणार नाही. आम्ही आमचा भूभाग सुरक्षित ठेवू, असा इशाराही सरमा यांनी दिला आहे. 

हा राजकीय मुद्दा नसून दोन्ही राज्यांतील सीमावाद आहे. दोन्ही राज्यांत काँग्रेसची सत्ता असतानाही हा वाद होता. काल झालेल्या गोळीबाराची पोलिसांकडून चौकशी केली जाईल. नागरिकांना हत्यारे कशी मिळाली, याचा शोध घेतला जाईल, असंही सरमा यांनी स्पष्ट केलं. झोरामथांगा यांनीही काल ट्विटरवरून आसामच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या वादात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com