गोव्यात घडला इतिहास; राज्यातील व्यक्ती पहिल्यांदाच राज्यपालपदी - Rajendra Arlekar becoming first Goan to occupy the Governor post | Politics Marathi News - Sarkarnama

गोव्यात घडला इतिहास; राज्यातील व्यक्ती पहिल्यांदाच राज्यपालपदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जुलै 2021

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करत असताना चार नवी राज्यपालांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार होणार आहे. विस्तार करत असताना केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत (Thavar Chand Gehlot) यांच्यासह चार नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली असून, तीन राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गोव्यातील राजेंद्र अर्लेकर यांचेही नाव आहे. (Rajendra Arlekar becoming first Goan to occupy the Governor post)

आतापर्यंत गोव्यातील एकाही व्यक्तीची इतर कोणत्याही राज्याचे राज्यपाल म्हणून अद्यापही नियुक्ती झालेली नव्हती. हा मान अर्लेकर यांना मिळाला आहे. त्यांची हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते गोवा विधानसभेचे माजी सभापती व माजी मंत्री आहेत. भाजपमध्ये सक्रीय होण्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत होते. दिवंगत मनोहर पर्रीकर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर अर्लेकर हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. 

हेही वाचा : राज्यात अनेक हत्ती अन् वाघ, हायकमांडने ठरवावे मुख्यमंत्री पदासाठी कोण योग्य!

2017 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार मनोहर आजगांवकर यांनी अर्लेकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर आजगांवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आता अर्लेकर यांना राज्यपाल पद देण्यात आले आहे. गोव्यातील एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच राज्यपाल पद मिळाले आहे. 

याविषयी भावना व्यक्त करताना अर्लेकर म्हणाले, आतापर्यंत गोव्यातील कुणीही राज्यपाल झाले नव्हते. मी पहिलाच असून त्याबद्दल आनंद वाटतो. नियतीनेच मला ही जबाबदारी दिली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. त्यानंतर आमदार, मंत्री झालो. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बनलो. आता मी राज्यपाल असेन. यावरून भाजपमधील नेत्यांना किती महत्व असते, हे दिसते, असे अर्लेकर म्हणाले.  

हेही वाचा : सरनाईक कुटूंबाला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ईडीला दिले हे आदेश

गेहलोत हे 83 वर्षांचे असून, त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार आहे. ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेले आहेत. आता त्यांच्यावर कर्नाटकच्या राज्यपालपदाची धुरा असेल. मंगूभाई छगनभाई पटेल हे गुजरातमधील भाजप नेते असून, त्यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाली आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार होता. राष्ट्रपतींनी हरी बाबू कंभमपती आणि राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची अनुक्रमे मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. कंभमपती हे आंध्र प्रदेशमधील भाजप नेते असून, अर्लेकर गे गोव्यातील भाजप नेते आहेत. 

दरम्यान, थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांची गोव्यात बदली करण्यात आली आहे. हरियानाचे राज्यपाल  सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरात तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बायस यांची झारखंडमध्ये बदली करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय यांची हरियानात बदली करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख