राजस्थानमधील बलात्कार प्रकरणी भाजप अडचणीत; पक्षाच्याच नेत्याला अटक - Rajasthan police arrests bjp leader smita verma in rape case | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानमधील बलात्कार प्रकरणी भाजप अडचणीत; पक्षाच्याच नेत्याला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

हाथरसमधील बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. आता राजस्थानमधील बलात्कार प्रकरणी भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. 
 

नवी दिल्ली : हाथरस येथील बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संतापाचे वातावरण आहे. हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना राज्य सरकारने 'नो एंट्री' केली आहे. आता प्रसारमाध्यमांनी हाथरसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. याचवेळी राजस्थानमधील बलात्कार प्रकरणी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मात्र, ही खेळी भाजपच्या अंगलट आली असून, भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

राजस्थानमधील बलात्कार प्रकरणारवरुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, राजस्थानमधील बलात्कार प्रकरणी काँग्रेस गप्प राहण्याचे धोरण स्वीकारल आहे. राहुल आणि प्रियंका गांधी तेथील घटनेवर काहीच बोलत नाही. परंतु, हाथरस प्रकरणावरुन ते नाटक करीत आहेत. 

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका अल्पवयीन मुलीवर आठ वेळा बलाल्कार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा स्मिता वर्मा यांचा समावेश आहे. वर्मा हिने या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून अनेक लोकांकडे पाठविले. या लोकांनी तिच्यावर अत्याचार केले. त्या मुलीने याला विरोध केल्यानंतर तिची व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी वर्मा हिने दिली होती. 

वर्मा हिला एका इलेक्ट्रिशियनचै पैसे द्यावयाचे होते. हे पैसै फेडण्यासाठी तिने या मुलीला इलेक्ट्रिशियनकडे पाठवले होते. त्यानेही या मुलीला अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. या प्रकरणी पूनम चौधरी नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून, ती काँग्रेस पक्षाशी निगडित असल्याचे समजते. हे सेक्स रॅकेट इतर राज्यांतही मुलींना पाठवत असल्याचा संशय असून, पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत आहेत. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार नराधमांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. 

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ आज हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले. णमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना महिला पोलिसांनी आमचे कपडे फाडले आणि आमच्या नेत्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीहल्ला केला. पुरुष पोलिसांनीही महिलांना धक्काबुक्की केली. ही घटना लाजीरवाणी आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख