काँग्रेस वाचवा..! पक्षाचे 15 नेते हाय कमांडच्या भेटीसाठी दिल्लीत - rajasthan congress sachin pilot loyalists will meet party high command | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस वाचवा..! पक्षाचे 15 नेते हाय कमांडच्या भेटीसाठी दिल्लीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. 

नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. काँग्रेस (Congress) हाय कमांडला भेटण्यासाठी पायलट गटाचे 15 नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्ष नेतृत्वाने भेट दिल्याशिवाय दिल्लीतून हलणार नाही, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले हे काँग्रेसचे 15 उमेदवार आहेत. त्यांनी याआधी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. राज्यातील काँग्रेसच्या सरकारमध्ये बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले नेते आणि अपक्ष आमदारांचे वर्चस्व वाढत असून, काँग्रेसचे नुकसान होत आहे. बाहेरुन आलेले आमदार आणि अपक्ष आमदार पक्षाला कमकुवत करीत आहेत, असा मुद्दा त्यांनी पत्रात मांडला होता. हे सर्व नेते पायलट गटाचे असून, बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आमदार आणि अपक्ष आमदार हे गेहलोत गटाचे आहेत. आता गेहलोत गटाच्या या आमदारांपासून पक्षाला वाचवा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांनी या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. या नेत्यांपैकी मनीष यादव म्हणाले की, पक्ष नेतृत्व आमच्याशी चर्चा करीत नाही तोपर्यंत आम्ही दिल्लीतून हलणार नाही. आमच्या समस्या नेतृत्वासमोर आम्ही मांडणार आहोत. आमचा हक्क पक्षात डावलला जात आहे. मुख्यमंत्री हे सरकारचे तर प्रदेशाध्यक्ष हे पक्षाचे राज्यात नेतृत्व करीत असल्याने ते जबाबदारीपासून पळ काढत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेला वाऱ्यावर सोडले गेले आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडत काँग्रेसच्या आमदाराचा 'शॉक'

पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली होती. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे.

पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षीही पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख