आपण एकाच कॉलेजमधील, असं म्हणत रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरची घेतली गळाभेट - railway minister ashwini vaishnaw embraces colleague engineer | Politics Marathi News - Sarkarnama

आपण एकाच कॉलेजमधील, असं म्हणत रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरची घेतली गळाभेट

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारामध्ये अश्विनी वैष्णव यांना अतिशय महत्वाचे असे रेल्वे खाते देण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारामध्ये राज्यसभेचे खासदार असलेले अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांना अतिशय महत्वाचे असे रेल्वे खाते (Railway ministry) देण्यात आले आहे. या निवडीमुळे वैष्णव यांचे नाव चर्चेत आले आहे. आता रेल्वेमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा वैष्णव एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात ते एका अधिकाऱ्याला मिठी मारताना दिसत आहेत. 

वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी ओळख करुन देण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवलं. तुम्ही शिकला त्याच कॉलेजमधून यांनी इंजिनिअरींग केले आहे, असे वैष्णव यांना सांगण्यात आले. यावर वैष्णव यांनी त्या अधिकाऱ्याला गळाभेट घेऊन असे म्हणत त्याला गळाभेट दिली.  

जोधूपरमधील एमबीएम कॉलेजमधून वैष्णव आणि त्या अधिकाऱ्याने इंजिनिअरींग केले आहे. या वेळी वैष्णव यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील किस्साही सांगितला. कॉलेजमध्ये सिनियरना ज्युनिअर बॉस म्हणत असे त्यांनी सांगितले. तसेच, तुम्ही आजपासून मला बॉस म्हणायचे, असा दिलखुलास विनोदही वैष्णव यांनी त्या अधिकाऱ्यासोबत केला. कॉलेजमध्ये सिनियरना नावाने तसेच, सर म्हणूनही बोलावले जात नव्हते, असेही त्यांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

हेही वाचा : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत जोतिरादित्य शिंदे तर राणे तिसऱ्या क्रमांकावर 

देशातील रेल्वे सध्या कात टाकू पाहत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेचं रुपडं बदललं जात आहे. बुलेट ट्रेन, हायपरलूपचे वारे वाहत असताना वैष्णव यांच्या रुपाने रेल्वेला त्याच तोडीचे कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. वैष्णव यांचा बायोडाटा सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यांनी घेतलेल्या पदव्या, उच्च पदांवर केलेले काम याची माहिती त्यामध्ये आहे. वैष्णव यांच्या रूपाने रेल्वे खात्याला उच्चविद्याविभूषित मंत्री मिळाले आहेत. त्यांनी इलेक्ट्रानिक्स अॅन्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे. ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर कानपूर आयआयटीतून पदव्यूत्तर पदवी तर अमेरिकेत एमबीएचे शिक्षण घेतले आहे. वैष्णव यांचे कौतुक होत आहेच पण त्यांच्या समावेशाबद्दल मोदींचेही आभार मानले जात आहेत. 

वैष्णव हे 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. या परीक्षेत देशपातळीवरील  गुणवत्ता यादीत त्यांचा 27 वा क्रमांक होता. त्यानंतर त्यांनी ओडिशातील बालासोर आणि कटक जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उप सचिव म्हणून काम केले. 2006 मध्ये ते मोरमुगाओ पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर दोन वर्षे एमबीए पदवीसाठी अमेरिकेला गेले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख