अखेर राहुल गांधींचा पुढाकार; विरोधी पक्षांना पाठवला महत्वाचा निरोप...

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
Rahul Gandhi invites opposition MPs for stategic meet
Rahul Gandhi invites opposition MPs for stategic meet

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणाचा भूतं केंद्र सरकारची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संसदेत विरोधी खासदारांकडून पेगॅससच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. पण सरकारचा नकार असल्यानं कोंडी निर्माण झाली आहे. (Rahul Gandhi invites opposition MPs for stategic meet)

आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संसदेत कोणत्याही मुद्यावर चर्चा होत नसल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सरकारकडून विरोधकांवर टीका केली जात असून चर्चेचं आवाहन केलं जात आहे. पण विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी राहुल गांधी सरसावले असून त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

मंगळवारी (दि. 2) संसदेतील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी बैठकीचं आमंत्रण दिलं आहे. संसदेजवळील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये सकाळी ही बैठक होणार आहे. तृणमूल काँग्रेसही या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सरकारच्या विरोधात एकत्रितपणे धोरण ठरवण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. राहुल गांधी यांच्याकडून सर्व नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या बैठकीला सुमारे 14 विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचं समजतं. 

बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षांचे खासदार व नेते संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आहे. पेगॅससच्या मुद्यावरून ते आक्रमक झाले असून सातत्यानं ट्विटरवरून सरकारवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे, पेगॅससच्या संभाव्य हेरगिरीच्या यादीत त्यांचे व निकटवर्तींयांचे मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झालं असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदेचे कामकाज व्यवस्थित चालत नसल्याने सरकारकडून अधिवेशन गुंडाळले जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेसह राज्यसभेतही विरोधकांनी पेगॅससवरून रान पेटवलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com