राहुल गांधींनी गाजावाजा न करता घेतली लस; संसदेत दोन दिवस दांडी

भारतातच संशोधित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.
राहुल गांधींनी गाजावाजा न करता घेतली लस; संसदेत दोन दिवस दांडी
Rahul Gandhi had taken a COVID19 vaccine yesterday

नवी दिल्ली : भारतातच संशोधित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. लशीच्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर न करता ही मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर काही नेत्यांनी कोरोना लस न घेण्याचे जाहीर केलं. पण त्यानंतर काँग्रेससह बहुतेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गाजावाजा करत लस घेतली. (Rahul Gandhi had taken a COVID19 vaccine yesterday)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मात्र आतापर्यंत लस घेतली नव्हती. ते लस कधी घेणार, याबाबतची चर्चा सोशल मीडियातही रंगली होती. त्यावरून भाजप नेत्यांकडूनही राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले जात होते. कदाचित त्यांनी लस घेतलीही असेल, असा दावाही केला जात होता. पण त्यांनी गुरूवारी (ता. 29) लस घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. याबाबत एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. 

कोणताही गाजावाजा न करता राहुल गांधी यांनी लस घेतल्याने त्यावरूनही सोशल मीडियात चर्चेला तोंड फुटले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी गुरूवारीच कोरोनाची लस घेतली आहे. त्यांनी गुरूवारी आणि शुक्रवारीही संसदेत हजेरी लावली नाही, असंही या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. पण त्यांनी कोणती लस घेतली याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. 

कोव्हॅक्सिनच्या मान्यतेवरून झालेल्या वादंगानंतर राहुल गांधींनी अनेक महिने लस घेतली नाही. त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावरही सातत्याने टीका केली जात आहे. सरकारने चुकीच्या पध्दतीने लसीकरण राबवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मांडणारे राहुल गांधी लस का घेत नाहीत, अशी टीका भाजपकडून सातत्याने केली जात होती. 

दरम्यान, कोरोना लसीकरणासाठी ओळखपत्र बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. पण देशभरात आतापर्यंत तब्बल 3 लाख 83 हजार जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय लस देण्यात आल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केला आहे.

लसीकरणासाठी कोविन पोर्टलच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येते. पण तिथे गेल्यानंतर कोविन पोर्टल नोंदणी करूनच लस दिली जाते. त्यासाठी कोणतेही एक ओळखपत्र मागितले जाते. पण ओळखपत्राशिवायही लाखो जणांना लस देण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. भारती पवार यांनीच याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे.

आतापर्यंत देशभरातील ३ लाख ८३ हजार जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय लस दिली आहे. हे लसीकरण २६ जुलै २०२१ अखेरपर्यंतचे आहे. ओळख नसलेल्या व्यक्तींनाही विशेष सत्रांद्वारे लस घेता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ओळखपत्र नसलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने कार्यपद्धती तयार केली आहे. तंत्रज्ञान उपलब्ध नसणाऱ्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावर एकट्याने किंवा समूहाने जाऊन नोंदणी करून लस घेता येऊ शकते. मोबाईल नसणाऱ्यांना कोविड-१९ ची १०७५ ही राष्ट्रीय हेल्पलाईन तसेच राज्याच्या हेल्पलाईनवरूनही नोंदणीचा पर्याय असल्याचे पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in