मुख्यमंत्रिपदी निवड झाली अन् पुष्करसिंह धामी म्हणाले, चॅलेंज स्वीकारले! - pushkar singh dhami will be new chief minister of uttarakhand | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्रिपदी निवड झाली अन् पुष्करसिंह धामी म्हणाले, चॅलेंज स्वीकारले!

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जुलै 2021

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी पुष्करसिंह धामी यांची निवड झाली आहे.  

डेहराडून : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) यांनी राजीनामा दिला होता. त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांच्यानंतर चार महिन्यांतच तिरथसिंह रावत यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. आज भाजप (BJP) आमदारांच्या बैठकीत पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली आहे.  

उत्तराखंडमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने  केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि भाजपचे प्रभारी दुष्यंतकुमार गौतम यांना पाठवले होते. प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली आज नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला हजर राहण्याचा पक्षादेश सर्व आमदारांना बजावण्यात आला होता. या बैठकीत पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली.  

धामी हे 45 वर्षांचे असून, त्यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. ते उत्तराखंडचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. धामी हे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या जवळचे मानले जातात. आमदारांच्या बैठकीनंतर बोलताना धामी म्हणाले की, मी हे आव्हान स्वीकारतो. पक्षाला पुढे नेण्यासाठी मी सर्वांचे सहकार्य घेईन.  

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत. तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वामसोर होता. सुमारे अर्धा डझन आमदार मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. यात चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याबरोबर सत्पाल महाराज, धनसिंह रावत आणि पुष्करसिंह धामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. अखेर धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

हेही वाचा : भाजपने स्वत:च्याच दोन मुख्यमंत्र्यांचे हसे करुन घेतले! 

त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी तिरथसिंह रावत यांची निवड झाली होती. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंह यांना पायउतार व्हावे लागले होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीपासून नारायणदत्त तिवारी वगळता एकाही मुख्यमंत्र्याला पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. याला त्रिवेंदसिंहही अपवाद ठरले नव्हते. त्यांना राज्यातील अपूर्ण कार्यकाळाची प्रथा मोडून काढण्यासाठी केवळ एक वर्षाचा कालावधी राहिला होता. आता तिरथसिंह रावत यांनीही राजीनामा दिल्याने नवीन मुख्यमंत्री नेमावा लागला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख