परवानगीशिवाय मोर्चा काढणं भोवलं; शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी

दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे.
परवानगीशिवाय मोर्चा काढणं भोवलं; शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी
Shiv SenaSarkarnama

चंडीगड : पंजाबमधील (Punjab) पातियाळा शहरात शुक्रवारी शिवसेना (Shiv Sena) आणि काही शीख संघटनांचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही गट तलवारी घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. तसेच एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली. या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पण शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मोर्चा काढणाऱ्या कार्यकारी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पंजाब शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला (Harish Singla) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोठा वाद झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा यांनी त्यांची हकालपट्टी केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या आदेशानुसार सिंगला यांना निलंबित करण्यात आल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पातियालामध्ये शुक्रवारी सायंकाळी सात ते शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Shiv Sena
ठाकरे सरकारने सरनाईकांवर केलेल्या 'मेहेरबानी'चा फैसला आता न्यायालयात

दरम्यान, पोलीस उपअधिक्षक मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही शिवसेनेचे प्रमुख हरीश सिंगला यांच्याशी बोलत आहोत. त्यांच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही घटना दुर्देवी असून सरकार राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करेल, असं मान यांनी म्हटलं आहे.

मान यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 'पातियाळामध्ये दोन गटांत झालेला वाद दुर्देवी आहे. मी पोलीस महासंचालकांशी बोललो आहे. घटनेच्या ठिकाणी सध्या शांतता आहे. आम्ही परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत. अशांतता पसरवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. पंजाबमधील शांतता आणि एकोपा हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे,' असं मान यांनी सांगितले.

पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली असून काही अफवांमुळे स्थानिक स्थिती बिघडली होती. या घटनेत जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांरकडून मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती. पण पोलिसांनी ही परवानगी नाकरली होती, असं तपासात समोर आले आहे. या घटनेटे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.