सिद्धूची सुरक्षा कुणी काढली? मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

काँग्रेस नेता व गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनं उडाली खळबळ
Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबंमधील (Punjab) काँग्रेसचा (Congress) नेता व प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंजाब पोलिसांनी सिद्धूसह 424 जणांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडला. यामुळं राज्यभरात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुरक्षा काढून घेण्याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याचबरोबर या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली होणार आहे. (Sidhu Moose Wala News Updates)

सिद्धूच्या हत्येनंतर पंजाबमधील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या झाल्याने आम आदमी पक्षाच्या सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. सिद्धूचे वडील बलकौरसिंग यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिले आहे. या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून करावा, अशी मागणी केली आहे. यानंतर सिद्धूची सुरक्षा काढून घेतल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मान यांनी दिले आहेत. याला जबाबदार कोण हे शोधलं जाईल, असंही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर पंजाब सरकारने या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी विद्यमान न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. सिद्धू हा लोकप्रिय कलाकार आणि पंजाबचा सांस्कृतिक चेहरा होता, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला हा त्याच्या गाडीतून जात असताना दोन गाड्यातून हल्लेखोर त्याचा पाठलाग करीत होते. जवाहरके गावात त्यांनी सिद्धूच्या गाडीवर गोळीबर केला. यात तो जागीच ठार झाला. दोन गुन्हेगारी टोळ्यांतील अंतर्गत संघर्षातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. हल्लेखोरांनी रशियन बनावटीच्या एएन-94 रायफलींचा वापर केला. सिद्धू याच्यावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्या किमान तीन रायफलींमधून झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याची खातरजमा करूनच तेथून पलायन केलं.

Sidhu Moose Wala
पोलिसांनी सुरक्षा काढून घेतली अन् 24 तासांतच काँग्रेस नेत्याची हत्या

सिद्धू मूसेवाला हा लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्तही आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला पक्षात आणण्यामागे नवज्योतसिंग सिद्धू यांचा हात होता. गायक सिद्धू हा 28 वर्षांचा होता आणि त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याच्यावर अनके गुन्हे दाखल होते. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल होते. त्याचे मूळगाव मानसामध्ये असून, त्याच मतदारसंघातून तो निवडणूक लढला होता. त्याचा आपचे उमेदवार विजय सिंगला यांनी पराभव केला होता.

Sidhu Moose Wala
असंही राजकारण! राज्यात काँग्रेसचे आमदार दोन पण राज्यसभेचे उमेदवार तीन

सिद्धू हा मानसातील मूसा गावातील होता. त्याची आई गावची सरपंच आहे. त्याच्या गाण्यातून अनेक वेळा जातीपातीतील भेदभावाचे समर्थन केले जाई. त्याचे खरे नाव सिद्धूसिंग असे आहे. अभियांत्रिकी करीत असताना त्याने कॉलेजमध्ये गाणे सुरू केले. त्याने एका गाण्यात एके-47 रायफलचा वापर केला होता. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात हे गाणे व्हायरल झाले होते. याचबरोबर सिद्धूवर गुन्हाही दाखल झाला होता. तो अनेकवेळा त्याच्या गाण्यात जातीच्या अभिमानाबद्दल बोलताना दिसायचा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com