भाजपच्या मदतीला पुन्हा धावून आला पाकिस्तान..! - pulwama attack will be main issue of bjp in bihar and west bengal elections | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या मदतीला पुन्हा धावून आला पाकिस्तान..!

मंगेश वैशंपायन
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहे. बिहारच्या प्रचारात स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जात आहे. 

नवी दिल्ली  : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानच्या संसदेत नुकत्याच झालेल्या खुलाशानंतर भाजपच्या हाती एक ठोस निवडणूक मुद्दा मिळाल्याचे  चित्र आहे. सध्या चालू असलेल्या बिहार निवडणुकीसह  आगामी काळात बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून  याचा हुकमी एक्क्यासारखा वापर होणार आहे. यासंदर्भातील रणनीती पक्षनेतृत्वाने आखली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक आणि सर्जिकल स्ट्राइकवर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या. काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबत प्रश्न उपस्थित केले होते. पुलवामा हल्ल्याचा राजकीय फायदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळाला, असा दावाही करण्यात आला होता. 

आता पाकिस्तानच्या संसदेतच पुलवामा हल्ल्याबाबतचा कबुलीजबाब आल्यानंतर भाजपने वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडून विरोधकांवर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे. एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात वादाचा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा भाजप वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यावर भर देण्यात येईल आहे. पोटनिवडणुका आहेत तेथे हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला आहेच पण निवडणुका नाहीत तेथेही भाजप पाकिस्तान, पुलवामा, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्टाईल या सर्व अनुषंगाने विरोधकांनी सैन्य दलांवर घेतलेल्या शंकांचा मुद्दा मांडणार आहे.

बिहार निवडणुकीत हा मुद्दा आता तापला आहे. आगामी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजप दहशतवादाचा मुद्दा जोरदारपणे मांडणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक हे गृहमंत्री अमित शाह यांची मोहीम मानली जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारचे लांगुलचालन धोरण व त्या अनुषंगाने भाजप आपल्या संपूर्ण प्रचाराचा पाया भक्कम करण्याच्या पूर्ण तयारीत आहे. 

बिहारच्या निवडणुकीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे न दिसलेले अमित शहा पुढील आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये जात आहेत. तेथे भाजपचे सरकार आणण्यासाठी पूर्ण अनुकूल स्थिती असल्याची माहिती  पक्ष नेतृत्वाला मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथसिंह, रविशंकर प्रसाद, दिलीप घोष यांच्यासह सर्व प्रमुख नेते आता पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यावरील पाकची कबुली हा बंगालमध्ये प्रचाराचा मुद्दा करण्यासाठी अनुकूल आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख