पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचा त्याच परिसरात दोन वर्षांनी चकमकीत खातमा

जम्मू- काश्‍मीरमध्ये 2019 मध्ये पुलवामा येथे निमलष्करी दलाच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता.
pulwama attack mastermind mohd ismail alvi killed in encounter
pulwama attack mastermind mohd ismail alvi killed in encounter

श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरमध्ये 2019 मध्ये पुलवामा (Pulwama Terror Attack) येथे निमलष्करी दलाच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मोहंमद इस्माईल अल्वी (Mohd Ismail Alvi) आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत (Pulwama Encpunter) ठार झाला. तो लंबू अथवा अदनान या नावानेही ओळखला जात होता. दहशतवादी मसूद अझहर याचा तो भाचा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

लंबू हा मुळचा पाकिस्तानचा राहणारा होता. मागील अनेक दिवसांपासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रातही त्याचे नाव होते. पुलवामा परिसरातच झालेल्या चकमकीत अखेर तो ठार झाला. या चकमकीत ठार झालेल्या अन्य दहशतवाद्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दहशतवादी आणि सुरक्षा दले यांच्यात पुलवामा जिल्ह्यातील दाचिगम जंगल परिसरात आज सकाळी चकमकीला सुरूवात झाली. या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या भागात सुरक्षादलांची शोध मोहीम सुरू होती त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दले आमनेसामने आल्यानंतर चकमक सुरू झाली. यात दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक लंबू होता. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. 

काश्‍मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. या कारवाईबद्दल त्यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, जैशे महंमदचा म्होरक्या लंबू अखेर चकमकीत ठार झाला आहे. तो मसूद अझहरच्या कुटुंबातील होता. पुलवामा हल्ल्याची आखणी त्याने केली होती. पुलवामा हल्ला झाला त्या दिवसापर्यंत तो आत्मघाती हल्लेखोर अदिल डार याच्यासोबत होता. अदिल डार यांच्या व्हायरल व्हिडीओत लंबूचा आवाज होता. 

पुलवामामध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले होते. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. सुमारे 350 किलो स्फोटकांनी भरलेले वाहन धडकावून दहशतवाद्यांनी हा आत्मघाती हल्ला केला होता. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com