मोदींचा हल्लाबोल  ;  शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक शांतता बिघडवत आहेत... - Prime Minister Narendra Modi's attack on the opposition | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींचा हल्लाबोल  ;  शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक शांतता बिघडवत आहेत...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

शेतकऱ्यांना फक्त खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली तेच आता कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक शांतता बिघडवत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  विरोधकांवर केला. 

नवी दिल्ली  :  ज्यांनी आतापावेतो शेतकऱ्यांना फक्त खोटे बोलून त्यांची दिशाभूल केली तेच आता कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक शांतता बिघडवत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर केला. 

संघपरिवारातही नाराजी असलेल्या तीन कामगार कायद्यांचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारतीय जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. भाजप कार्यकर्त्यांना व्हिडीओ कॉनफन्सद्वारे संबोधित करताना संसदेत रेटलेल्या 3 वादग्रस्त कृषी कायद्यांचा युक्तिवाद करण्यासाठी मंत्र्यांची फौज उतरवूनही देशभरातील अन्नदात्याच्या मनातील ठाम अविश्‍वास-संशय-संताप कायम असल्याची सल मोदींनी पुन्हा बोलून दाखविली. 

मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की भाजप कार्यकर्त्यांनी देशात शेतकऱ्यांबरोबर बसून, सातत्याने बोलून सरळ भाषेत त्यांना नव्या कृषी कायद्यांचे फायदे पटवून दिले पाहिजे. याचा लाभ अतिशय छोट्या शेतकऱ्यांना मिळेल. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्याला कर्ज काढण्यास भाग पाडणारी व्यवस्था बदलल्याचेही त्यांना सांगितले . कृषी कायद्यांच्या निमित्ताने ज्यांनी सातत्याने खोटेपणा केला तेच आता शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करत आहेत,  शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल अफवा पसरवत आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके शेतकरी व कामगारांच्या नावाने नुसत्या घोषणा दिल्या जायच्या, मोठमोठे जाहीरनामे निघायचे. पण ते सारे किती पोकळ होते हे काळानेच दाखवून दिले आहे. या लोकांमुळेच समाजात अव्यवस्था व अनाचार, अभाव व असमानता, असुरक्षा व असमाजिकता वाढली, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

 काय म्हणाले नरेंद्र मोदी 

  1. - भाजप सरकारनेच शेतकऱ्यांना खर्चाच्या दीड पट एमएसपीची हमी व सरकारी खरेदीही सुनिश्‍चित केली.
  2. -पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीद्वारे देशातील 10 कोटींहून जास्त सेतकऱ्यांच्या खात्यांत 1 लाख कोटींहून जास्त रक्कम जमा झाली आहे.
  3. - कोरोना काळात सेवा करता करता मृत्यू आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मी आदरांजली वाहतो.
  4. - कोरोना आरोग्यनियम पाळण्याबाबत समाजात आणखी जागृती करावी.
  5. - राष्ट्रीय शिक्षण धोरणावर ठिकठिकाणी 5 किंवा 7 दिवसांचे मेळावे घेऊन विद्वानांकडून याबाबतच्या सूचना मागवाव्यात
  6. - भाजप जगातील सर्वांत विशाल राजकीय पक्ष असला तरी आमचा संपर्क छोट्यात छोट्या गावापर्यंत व छोट्याशा गल्लीपर्यंतही पाहिजे.
  7. - आमचा मंत्र स्पष्ट आहे व आमच्यासाठी राष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे.
  8. - देशातील गरीब, शेतकरी, कामगार हे सारे आत्मनिर्भर भारताचे मजबूत स्तंभ आहेत. त्यांचा आत्मसन्मान व आत्मगौरवच आत्मनिर्भर भारताची प्राणशक्ती आहे.
  9. - ठेकेदारीवरील मजुरीऐवजी विशिष्ट कालावधीसाठी निश्‍चित रोजगार मिळण्याचा पर्याय कामगार कायद्यांमुळे खुला झाला आहे.
  10. - बांधकाम, शेती, पत्रकारिता, चित्रपट उद्योग यातील कामगारांसाठी वेगवेगळे याआधी कायदे होते. फक्त किमान मजुरीबाबत तब्बल 10 हजार कायद्यांचे जंजाळ निर्माण करून ठेवण्यात आले होते. अनेक प्रयत्नानंतर आता त्यांची संख्या 200 वर आणली आहे.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख