गर्भवतींसाठी गुड न्यूज : थेट लसीकरण केंद्रात जाऊन घ्या लस... - Pregnant Women now eligible for COVID19 Vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

गर्भवतींसाठी गुड न्यूज : थेट लसीकरण केंद्रात जाऊन घ्या लस...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

कोरोना संसर्गाचा अधिक धोका असलेल्या गटामध्ये गर्भवती महिलांचा समावेश होतो.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गापासून बचावासाठी देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. देशात आतापर्यंत जवळपास 34 कोटी डोस देण्यात आले आहेत. यापुढे आता गर्भवती महिलांनाही लस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्रालयाने याबाबत घोषणा केली असून त्याबाबतची नियमावलीही प्रसिध्द केली आहे. (Pregnant Women now eligible for Covid19 Vaccination)

कोरोना संसर्गाचा अधिक धोका असलेल्या गटामध्ये गर्भवती महिलांचा समावेश होतो. देशात सध्या 18 वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. पण त्यामध्ये या महिलांचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांना लस देण्यात आली नाही. आता लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) केलेली शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वीकारली असून आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

हेही वाचा : कसाबलाही कायद्याद्वारे संधी मिळाली होती; अनिल देशमुखांचा युक्तीवाद

गर्भवती महिलांना कोविन (CoWin) द्वारे लसीकरणासाठी नाव नोंदवता येईल किंवा थेट जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊनही नोंदणी करत लस घेता येणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. याबाबतची नियमावली सर्व राज्यांना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गर्भवती महिलांचा कोरोनापासून बचाव होण्यास मदत होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॅा. बलराम भार्गव यांनी काही दिवसांपूर्वीच गर्भवती महिलांना लस देणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. 

'आयसीएमआर'च्या अभ्यासानुसार, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला. तसेच या महिलांचा मृत्यू व त्यांच्यामध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांचे प्रमाणही तुलनेने खूप जास्त होते, असे अभ्यासात आढळून आले होते. पुढील काही महिन्यांत देशात तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर या महिलांनाही लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  

दरम्यान, देशात दोन जुलैपर्यंत लशीचे 34 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 19 कोटी 91 लाख डोस 45 वर्षांपुढील नागरिकांना दिले आहेत. तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 9 कोटी 65 लाख, आरोग्य कर्मचाऱ्यांना 1 कोटी 74 लाख आणि फ्रंटलाईन वर्कर्सला 2 कोटी 71 डोस देण्यात आले आहेत. जून महिन्यात लसीकरणाची दैनंदिन सरासरी 39 लाख 89 हजारांपर्यंत वाढली, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख