Prashant Kishor resigns as principal advisor to Capt Amarinder Singh
Prashant Kishor resigns as principal advisor to Capt Amarinder Singh

अमरिंदर सिंग यांना धक्का! प्रशांत किशोर यांचा सल्लागार पदाचा तडकाफडकी राजीनामा

प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या तोंडावरच साथ सोडल्याने मुख्यमंत्र्यांना धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आणखी एक धक्का बसला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मिळवत त्यांच्यावर कुरघोडी केल्यानं आधीच ते पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता त्यांचे प्रधान सल्लागार प्रशांत किशोर यांनीही त्यांची साथ सोडली आहे. किशोर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून तसे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. (Prashant Kishor resigns as principal advisor to Capt Amarinder Singh)

प्रशांत किशोर हे राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जातात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्यांच्या रणनितीचाही मोठा वाटा होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृममूल काँग्रेस तर तमिळनाडूत एम. के. स्टॅलिन यांच्या पक्षासाठी त्यांनी काम केले. दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. या यशानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रशांत किशोर यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं.

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. नवज्योत सिंग सिध्दू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील शीतयुध्द अद्यापही सुरूच आहे. त्यातच प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या तोंडावरच साथ सोडल्याने मुख्यमंत्र्यांना धक्का बसला आहे. सार्वजनिक आयुष्यातून आपण तात्पुरता ब्रेक घेत असल्याचे किशोर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

'सार्वजनिक आयुष्यातून तात्पुरता ब्रेक घेण्याबाबतच्या माझ्या निर्णयाविषयी तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे तुमची प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारणे मला शक्य होणार नाही. यापुढे भविष्यात काय करायचे हे अद्याप मी ठरवलेलं नाही. त्यामुळं मी तुम्हाला या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करतो,' असं किशोर यांनी पत्रात लिहिलं आहे. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांची भेटही घेतली आहे. त्यानंतरच ही चर्चा सुरू झाली होती. राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, याबाबत अद्याप पक्ष किंवा किशोर यांच्याकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com