देशातील 108 कोटी जनतेला डिसेंबरपर्यंत कोरोना लस देणार; जावडेकरांची घोषणा

देशात सध्या कोरोना लस टंचाई आहे. यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे.
prakash javadekar says central government will vaccinate all by december 2021
prakash javadekar says central government will vaccinate all by december 2021

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात सध्या लस टंचाई आहे. यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. अशा परिस्थितीतही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी देशातील 108 कोटी जनतेला डिसेंबरपर्यंत कोरोना लस देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. 

देशात आतापर्यंत 3 टक्क्यांपेक्षाही कमी जनतेचे कोरोना लसीकरण झाले आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी जावडेकरांनी आज पत्रकार परिषद घेतली. जावडेकर म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे लसीकरणाची ब्लू प्रिंट तयार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत देशातील 108 कोटी जनतेला कोरोना लस देण्यात येणार आहे. जगात सर्वाधिक वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक दुसरा आहे. 

भारतातील लसीकरण 2021च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. आरोग्य मंत्रालयाने 108 कोटी जणांना 216 कोटी डोस देण्यासाठीची ब्लू प्रिंट तयार केली आहे. राहुल गांधींनी एवढीच लसीकरणाची काळजी असेल तर त्यांनी काँग्रेसशासित राज्यांना सल्ला द्यावा. काँग्रेसच्या राज्यांची स्थिती बिघडली आहे. ही राज्ये 1 मेपासून त्यांना देण्यात येत असलेल्या 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाचा कोटाही घेत नाहीत, असे जावडेकर म्हणाले. 

काँग्रेसवर पुन्हा एकदा टूलकिटचा आरोप करीत जावडेकर म्हणाले की, राहुल गांधी ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यातून एक गोष्ट सिद्ध होते की टूलकिट त्यांनीच बनवले आहे. त्यांची भाषा, तर्क आणि भीती पसरवण्याची पद्धती पाहून हे लक्षात येत आहे. हा सगळ्या त्यांच्या रणनीतीचाच भाग आहे. 

भारतात लसीकरण केंद्रे बंद 
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, आता लस नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com