भाजपने पोस्टरबॉय बनवलेले पायलट थेट विरोधातच उतरले मैदानात - posters put up by bjp in madhya pradesh using sachin pilots photogarphs | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपने पोस्टरबॉय बनवलेले पायलट थेट विरोधातच उतरले मैदानात

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी सुरू आहेत. आता सचिन पायलट या रणधुमाळीत उतरत आहेत. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांच्या प्रचारात काँग्रेसकडून सचिन पायलट यांनी प्रचारात उतरवले जाणार हे भाजपने आधीच ओळखले होते. यामुळे भाजपने पायलट यांची मोठ्या प्रमाणात पोस्टर लावली होती. पायलट यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचणाऱ्या या पोस्टरवरुन मोठी चर्चा झाली होती. आता भाजपने पोस्टरबॉय बनवलेले पायलट हे भाजपच्या विरोधात थेट मैदानात उतरत आहेत. 

जोतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला रामराम केल्यानंतर काही काळाने सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. पायलट यांचे बंड शमवण्यात पक्षाला अखेर यश आले होते. आता पायलट यांना थेट मध्य प्रदेशातील रणधुमाळीत उतरवण्याचा मोठा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. 

मध्य प्रदेशातील गुज्जर मते आकर्षित करण्यासाठी पायलट यांचा वापर काँग्रेस करुन घेईल, असा भाजपचा कयास होता. आता हा कयास खरा ठरला आहे. याचबरोबर पायलट यांचे मित्र असलेले जोतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करण्यासाठी पायलट यांचा वापर काँग्रेसकडून केला जाणार आहे. काँग्रेसच्या या खेळीच्या कल्पना आधीच आल्याने भाजपने पायलट यांची पोस्टर ग्वाल्हेर भागात लावण्यात आली होती. 

पायलट यांच्यावरील अन्यायाचा पाढा या पोस्टरवर लिहिण्यात आला होता. यावर लिहिले होते की, काँग्रेस किती काळ पायलट यांचा अपमान करणार आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये प्रदेशाध्यक्षपद देऊन पायलट यांच्याकडून दिवसरात्र काम करवून घेतले. मात्र, मुख्यमंत्री म्हणून वृद्ध गेहलोतांना पसंती दिली. पायलट यांनी त्यांचा हक्क मागितला त्यावेळी त्यांची सर्व पदे काढून घेतली. त्यांना नाकारा, निकम्मा असे संबोधण्यात आले. आता काँग्रेसकडून स्वाभिमानी गुज्जर समाजाची मते मागण्यासाठी पायलट यांचा वापर केला जाणार आहे. 

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये जोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांची नावे अग्रक्रमाने घेतली जात असत. यातील शिंदे हे मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारविरोधात बंड करुन भाजपमध्ये गेले. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले. हे काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. शिंदे आणि पायलट हे दोघे मित्र आहेत. काँग्रेसने आता पायलट यांनाच मित्राविरुद्ध मैदानात उतरवण्याची खेळी खेळली आहे. 

पायलट यांनी गेहलोत यांच्या विरोधात बंड केले त्यावेळी शिंदे यांनी उघडपणे मित्राची बाजू घेतली होती. काँग्रेस पक्षात तरुणांवर अन्याय होत असल्याची भूमिकाही शिंदे यांनी घेतली होती. आता पायलट हे काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी मध्य प्रदेशात येत आहेत. त्यामुळे ते शिंदे यांच्याविरोधात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पायलट हे भिंड, मोरेना आणि शिवपुरी मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. नरवार-शिवपुरी, शैतानबाडा, जोरा, सुमावली, नूराबाद, मानबसाई, गोर्मी आणि गोहड येथे ते 27 आणि 28 ऑक्टोबर प्रचार करणार आहेत. याचबरोबर 28 ऑक्टोबरला त्यांची पत्रकार परिषदही होणार आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणले आहे.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख