in poll bound tamil nadu election commission confiscated 428 crore
in poll bound tamil nadu election commission confiscated 428 crore

राज्यात उद्या मतदान अन् आज सापडले तब्बल ४२८ कोटींचे घबाड!

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. उद्या तमिळनाडूत मतदान होत आहे.

चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यात उद्या मतदान असून, निवडणूक आयोगाला ४२८ कोटी रुपयांचे घबाड सापडले आहे. यात रोख रकमेसह सोन्याचाही समावेश आहे. ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी असल्याचा संशय असून, यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २२५.५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. याचबरोबर १७६.११ कोटी रुपयांच्या सोन्यासह इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश यात आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात दारुही जप्त करण्यात आली. आयोगाकडून मागील काही आठवड्यांपासून अनेक ठिकाणी छापे मारण्यात येत आहेत. 

याविषयी बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, करुरमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल कोईमतूर, तिरुप्पूर आणि चेन्नईत कारवाई करण्यात आली. मागील २४ तासांत कारवाईला वेग देण्यात आला होता. यात रानिपेट जिल्ह्यात ९१.५६ लाख रुपये, चेन्नईतील थाऊजंड लाईट मतदारसंघात १.२३ कोटी रुपये आणि सालेममधील वीरापांडी येथे १.१५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

स्टॅलिन यांच्या जावयावरही याआधी छापे 
द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर प्राप्तिकर विभागाने नुकते छापे मारले होते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. स्टॅलिन यांनी या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. प्राप्तिकर विभागाने स्टॅलिन यांची मुलगी सेंथामाराई आणि जावई सबारीसन यांच्याशी निगडित चार ठिकाणी छापे मारले होते. 

याविषयी बोलताना स्टॅलिन म्हणाले होते की, अशा प्रकारांमुळेच जनता ६ एप्रिलला स्पष्ट कौल देणार आहे. मी एम.के.स्टॅलिन आहे. पंतप्रधान मोदींना माहिती असायला हवे की आम्ही तुमच्यासमोर झुकण्यासाठी अण्णाद्रमुकचे नेते नाही आहोत. मी आज सकाळी त्रिचीवरुन चेन्नईत आल्यानंतर या कारवाईची माहिती मला मिळाली. मोदी सरकार हे राज्यातील अण्णाद्रमुक सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी मोदींना सांगू इच्छितो की, आमचा पक्ष द्रमुक आहे हे विसरु नका. मी कलैग्नार (ए.करुणानिधी) यांचा पुत्र असून, मी असल्या गोष्टींमुळे घाबरत नाही. 

तमिळनाडूत ६ एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मतमोजणी आणि निकाल हे २ रोजी आहेत. राज्यात ६ कोटी २८ लाख २३ हजार ७४९ मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. जनमत चाचण्यांचा कल द्रमुकच्या बाजूने असून, मुख्यमंत्रिपदासाठी स्टॅलिन यांच्या नावाला पसंती मिळत आहे. यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीने निवडणुकीसाठी आणखी ताकद लावली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com