भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्यांसह इतर भाजप नेते अडचणीत

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नेत्यांकडून प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
police warns political leaders about provocative speeches in ghmc campaign
police warns political leaders about provocative speeches in ghmc campaign

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा इशारा दिल्याने सूर्यांसह इतर नेते अडचणीत आले आहेत.  

हैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून,  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.  

खासदार तेजस्वी सूर्या यांनी टीआरएस आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका करताना प्रक्षोभक भाषा वापरली होती. याचबरोबर उस्मानिया विद्यापीठात ते विनापरवानगी गेले होते. विद्यापीठात विनापरवानगी गेल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तेजस्वी सूर्यांनी विनापरवानगी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्याची तक्रार विद्यापीठाच्या कुलसचिवांनी केली होती. 

भाजपच्या नेत्यांकडून सुरू असलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे तेलंगणचे पोलीस महासंचालक महेंदर रेड्डी यांनी प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, काही घटक धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही त्यांची भाषणे काळजीपूर्वक तपासत आहोत. यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल. यापुढील काळातही प्रचारातील सर्व भाषणे तपासून कारवाई करण्यात येईल. 

दरम्यान, भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवण्याची तयारी केली आहे. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले की, तुम्ही ओल्ड सिटीत प्रचारासाठी नरेंद्र मोदींना आणा. बघा मग काय होते. तुम्ही त्यांची सभा येथे आयोजित करा आणि पाहा तुम्हाला शेवटी किती जागा मिळतात. 

महापालिका निवडणुकीसाठी भाजप एवढे बडे नेते मैदानात उतरवत आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची भाषा विकासाची नाही. हैदराबादचा विकास आधीच झालेला असून, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येथे आहेत. परंतु, भाजपला हे सगळे उध्वस्त करायचे आहे. त्यांना हैदराबादचे ब्रँडनेम संपवायचे आहे, अशी टीकाही ओवेसी यांनी केली. 
 
हैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करावा, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार केले होते. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले होते की, भाजपचे नेते नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कळेनाशी झाली आहे. त्यांनी निश्चितपणे 'अहमुदिल्ला'मधील बिर्याणी (हे हॉटेल बीफ बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे) खावी. 

यावर भाजपचे आमदार राजासिंह म्हणाले होते की, ओवेसी यांनी पोर्क बिर्याणी खावी. माझ्या परिसरात आज ही बिर्याणी वाटण्यात येत आहे. आमच्या परिसरातील वाल्मिकी समाज चांगली पोर्क बिर्याणी करतो. तुम्हाला बिर्याणी आवडत असेल तर तुम्हाला चवदार बिर्याणी मी देतो. 

हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com