मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी महिलेला मुलीसमोरच भरबाजारात केली बेदम मारहाण - police thrash woman for not wearing mask in madhya pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी महिलेला मुलीसमोरच भरबाजारात केली बेदम मारहाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 मे 2021

देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. 

भोपाळ : देशातील कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध (Lockdown) लादण्यात आले आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असून, मास्क (Mask) घालणे बंधनकारक आहे. परंतु, भाजी खरेदीसाठी गेलेल्या महिलेला केवळ मास्क घातला नाही म्हणून भरबाजारात पोलिसांनी (Police) मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेची मुलगीही त्यावेळी तिच्यासमवेत होती. 

ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात जिल्ह्यातील राहली येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित महिला मुलीसमवेत भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने मास्क घातला नव्हता. यामुळे पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. तिच्या मुलीने पोलिसांनी अनेक वेळा विनवणी करुनही पोलिसांनी मारहाण सुरू ठेवली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. 

हेही वाचा : दिलासादायक : देशात 24 तासांत नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे सुमारे लाखभर अधिक 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही महिला पोलिसासह काही पुरुष पोलीस कर्मचारी एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. ते तिला जमिनीवर खाली पाडून केसाला पकडून तिला फरफटत ओढून नेतानाही दिसत आहेत. तिला पोलीस जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत असताना ती विरोध करीत आहे आणि पोलीस तिला मारहाण करीत आहेत. 

पोलीस म्हणतात, आमची चूक नाहीच
पोलिसांनी मात्र, या प्रकरणात आपली चूक नसल्याची भूमिका घेतली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, संबंधित महिलेने मास्क न घातल्याने आम्ही तिला अडवले. तिला खुल्या कारागृहात शिक्षा देण्यासाठी आम्ही नेत असतानी तिने विरोध केला. तसेच, आमच्या एका महिला पोलिसाला मारहाण केली. 

राहलीचे उपविभागीय अधिकारी कमलसिंह म्हणाले की, व्हिडीओमध्ये केवळ अर्धाच भाग आहे. त्या महिलेने सुरवातीला महिला पोलिसाला मारहाण केली. संबंधित महिला पोलिसाच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. 

देशात 24 तासांत 3 हजार 874 मृत्यू 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख 76 हजार 110 नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 57 लाख 72 हजार 440 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 87 हजार 122 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख