अभिनेत्री आली पण...रोड शो मध्येच सोडून परतली! - police stopped actress amisha patel road show in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेत्री आली पण...रोड शो मध्येच सोडून परतली!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असल्याने आज प्रचाराचा जोर दिसून आला. 

पाटणा : बिहारमध्ये उद्या (ता.28) पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामुळे राज्यात प्रचाराचा विशेष जोर दिसून आला. सर्वच पक्षांनी रोड शोवर भर दिला. लोक जनशक्ती पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेत्री अमिषा पटेल ही रिंगणात उतरली होती. परंतु, तिला रोड शो मध्येच थांबवून परतावे लागल्याची घटना आज घडली. 

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार डॉ. प्रकाश चंद्रा यांच्या प्रचारासाठी ओबरा मतदारसंघात अमिषा पटेल हिचा आज रोड शो होता. रोड शो करण्यासाठी अमिषा दाऊदनगर येथे पोचली. या वेळी एवढी गर्दी जमली होती की पाय ठेवण्यासही जागा नव्हती. रस्त्याच्या दुतर्फा अमिषाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे वाहतुकीचीही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.  

ओबरा येथे रोड शो केल्यानंतर अमिषा परतताना दाऊदनगर भागात रोड शो करणार होती. या वेळी तिच्यासोबत उमेदवार प्रकाश चंद्रा हेही होते. अमिषाचा रोड शो मौलाबागेतील शाळेजवळ पोचल्यानंतर दाऊदनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी थांबवला. सायंकाळचे चार वाजून गेले असून, त्यानंतर प्रचार कऱण्यास परवानगी नाही, असे कारण पोलिसांनी दिले. त्यामुळे रोड शो मध्येच सोडून अमिषा पटेलला परतावे लागले. यामुळे उमेदवार चंद्रा यांच्यासह कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाला. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. काँग्रेस बिहारमध्ये 70 जागा लढवत आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख