पाकिस्तान अराजकाच्या उंबरठ्यावर...निमलष्करी दल-पोलीस आमनेसामने

पाकिस्तानची धुरा इम्रान खान यांनी स्वीकारल्यापासून देशात सर्वांत मोठा संघर्ष सुरू झाला आहे. इम्रान खान यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील हा सर्वांत मोठा तिढा ठरलाआहे.
police and paramilitary face off in pakistan amid political crisis in country
police and paramilitary face off in pakistan amid political crisis in country

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पोलीसप्रमुखाचे निमलष्करी दलांनी अपहरण केल्याच्या घटनेवरुन देशभरात गदारोळ उडाला आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाची धार वाढली आहे. इम्रान खान यांच्या हकालपट्टीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असून, देश अराजकाच्या उंबरठ्यावर पोचला आहे. 

रेंजर्स या निमलष्करी दलाने दक्षिण सिंध प्रांताचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक अहमद महर यांच्या घरावर छापा घातला होता. रेंजर्सनी महर यांचे अपहरण केले होते. विरोधी पक्षनेते सफदर अवान आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पक्षाचे प्रवक्ते मुस्तफा नवाझ खोखार यांच्या अटकेच्या आदेशावर जबरदस्तीने महर यांना स्वाक्षरी करावयास लावली, असा आरोप होत आहे. सफदर हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आहेत. 

या प्रकरणी पोलीस आणि रेंजर्स आमनेसामने आले आहेत. इम्रान खान यांच्या लष्कर समर्थक सरकारने अद्याप या मुद्द्यावर जाहीर भूमिका घेतलेली नाही. पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनीही याविषयी बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, सिंध पोलीस प्रमुखांच्या अपहरणाच्या चौकशीचा आदेश लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी दिला आहे. लष्कराचा सरकारमधील हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. यावरुन इम्रान यांचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. 

महर यांच्यासह सिंध पोलीस दलाच्या 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी साठ दिवसांची रजा मागितली आहे. महर यांच्या अपहरणामुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे कारण देण्यात आले. नंतर या प्रकरणी लष्कराने चौकशीचा आदेश देण्यात आल्याने महर यांनी रजेचा अर्ज मागे घेतला आहे. लष्कराचा चौकशी अहवाल येईपर्यंत सहकाऱ्यांनी रजेचे अर्ज मागे घ्यावेत, असे महर यांनी म्हटले आहे.  

इम्रान खान यांच्या विरोधात 11 पक्षांची एकत्रित आघाडी आंदोलन करीत आहेत. आता रेंजर्स आणि पोलीस संघर्षामुळे विरोधी पक्षांच्या आंदोलनाला आणखी जोर आला आहे. देशभरात सरकारविरोधात विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत आहेत. देशातील वाढती महागाई आणि अन्नधान्याची टंचाई या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले आहे. याचबरोबर सरकारच्या कामकाजातील लष्कराचा हस्तक्षेप थांबवावा, अशी प्रमुख मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com