प्रत्यार्पणाला मंजुरी पण...विजय मल्ल्याचा कित्ता नीरव मोदी गिरवणार का?

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अखेर ब्रिटनच्या सरकारने परवानगी दिली आहे.
pnb fraud accused nirav modi can challenge extradition order in uk high court
pnb fraud accused nirav modi can challenge extradition order in uk high court

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी व हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अखेर ब्रिटनच्या सरकारने परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी मोदीच्या प्रत्यार्पण आदेशावर आज स्वाक्षरी केली. मोदीप्रमाणेच उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील मिळाला होता. मात्र, अजूनही मल्ल्याचे प्रत्यार्पण होऊ शकलेले नाही. त्यामुळे मोदीही मल्ल्याचा कित्ता गिरवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षरी झाली आहे. मात्र, तो या निर्णयाला 28 दिवसांत ब्रिटनच्या उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो. हे आव्हान दिल्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया काही महिने अथवा वर्षेही चालू शकते. उद्योगपती विजय मल्ला यानेही त्याच्या फेब्रुवारी 2019 मधील प्रत्यार्पण आदेशाला आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याची याचिका मागील वर्षी मे महिन्यात फेटाळून लावली असली तरी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत ब्रिटनने त्याचे भारताकडे अद्याप प्रत्यार्पण केलेले नाही. 

मल्ला याच्या प्रत्यार्पणाप्रमाणे मोदीच्या प्रकरणात घडण्याची शक्यता आहे. त्याने प्रत्यार्पण आदेशाला आव्हान दिल्यास कायदेशीर प्रक्रियेत त्याचे प्रत्यार्पण अडकेल. त्यामुळे प्रत्यार्पणास मंजुरी मिळाली असली तरी तो भारतात कधी येईल याबद्दल ठामपणे आताच काही सांगता येणार नाही. मोदीच्या पुढील कायदेशीर पावलांवर त्याचे भारतात येणे अवलंबून असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मंजुरी देऊन हे प्रकरण गृह मंत्र्यांकडे पाठवले होते. आता गृह मंत्र्यांनी मोदीच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली आहे. पीएनबीमधील 14 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात मोदी हा आरोपी आहे. मोदी हा हिरे व्यापारी असून, त्याची देश आणि विदेशात अनेक शोरुम होती. त्याला प्रत्यार्पण वॉरंटवर लंडनमधील मेट्रो स्थानकात 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने याआधी अनेकवेळा फेटाळले आहेत. 

मोदीसाठी आर्थर रोड कारागृहातील बरॅक क्रमांक 12 
आर्थर रोड कारागृहाच्या बरॅक क्रमांक १२ मध्ये मोदीला ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्य़कारी अधिकारी पीटर मुखर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बरॅक क्रमांक 12 मध्येच ठेवण्यात आले होते. भारतातील तुरुंगाची स्थिती चांगली नसल्याचे नीरव मोदीकडून ब्रिटनच्या न्यायालयात सांगण्यात आले होते. मात्र, आर्थररोड कारागृह हे व्यवस्थित असल्याचे निरीक्षण ब्रिटिश न्यायालयाने नोंदवले होते.  मोदीला ठेवण्यात येणाऱ्या बरॅकचा व्हिडिओही ब्रिटनच्या न्यायालयाला दाखवण्यात आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com