
PM Narendra Modi's Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देश विदेशातील राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली वाहत शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं त्यांच्या आई हिराबेन यांच्याशी असलेलं नातं सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या मुलाखती, भाषणाद्वारे त्यांच्या जीवनातील आईचं महत्व कायमच विशद केलं होतं. तसेच ज्या ज्यावेळी ते गुजरातला येत होते. त्यावेळी आवर्जून आपल्या आईची भेट घेत असत. आणि त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करत जेवणाचा देखील आस्वाद घ्यायचे. गुजरात निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असतानाही मोदींनी त्यांच्या आईची भेट घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी 18 जून रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. यावेळी आईविषयी भावना व्यक्त करताना एक ब्लॉग लिहिला होता. त्यावेळी आई हीराबेन यांनी आपल्याला जीवनाचा कानमंत्र दिल्याचा देखील उल्लेख केला होता. मोदी म्हणाले, आईनं काम नेहमी बुध्दीनं करायचं आणि जीवन शुध्दीनं जगायचं असा कानमंत्र दिला होता. ज्याचं मी कायम पालन करत आलो आहे.
आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या ब्लॉगमध्ये काय होतं?
आज मला हे सांगताना खूप आनंद होतोय आणि हे माझे सौभाग्य समजतो की, माझी आई श्रीमती हिराबा मोदी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. हे तिचे जन्मशताब्दी वर्ष असणार आहे. यावेळी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये हीराबेन मोदी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य...
पंतप्रधान मोदी म्हणाले, माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य आहे. अगदी सर्व मातांप्रमाणे. लहान वयात पंतप्रधान मोदी यांच्या आईने आपली आई गमावली. तिला माझ्या आजीचा चेहरा किंवा तिच्या कुशीतली मायेची ऊबही आठवत नाही. तिने तिचे संपूर्ण बालपण आईशिवाय घालवले.
मातीच्या भिंती आणि छतावर मातीची कौले असलेल्या वडनगरमधील छोट्याशा घराची आठवण त्यांनी सांगितली. आई-वडील आणि भावंडांसोबत तिथे ते राहत होते. त्यावेळी असंख्य दैनंदिन संकटे उभी ठाकत. आईने तोंड देत त्यावर यशस्वी मात केली असं देखील मोदींनी लिहिलं होतं.
आईने केवळ घरातील सर्व कामे एकटीनेच केली नाहीत तर घराच्या तुटपुंज्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठीही काम केले. घरखर्च भागवण्यासाठी ती काही घरात धुणीभांडी करायची आणि चरखा कातण्यासाठीही वेळ काढायची.
स्वच्छतेबाबत आईचा कटाक्ष असायचा, त्याबद्दल ती फार आग्रही होती. स्वच्छता राखण्याबाबतच्या शिस्तीची झलक मिळणारे काही प्रसंग मोदी यांनी सामायिक केले. आईला स्वच्छता आणि स्वच्छता कार्यात सहभागी असलेल्यांबद्दल खूप आदर होता असेहीू मोदी म्हणाले होते.
'' मी कदाचित एक सामान्य माणूस म्हणून तुला जन्म दिला असेल....''
आईने त्यांना जाणीव करून दिली की औपचारिक शिक्षण न घेताही शिकणे शक्य आहे. त्यांनी एक घटनाही सांगितली. मोदी यांना त्यांच्या सर्व शिक्षकांचा जाहीर सन्मान करायचा होता, त्यात त्यांच्या सर्वात मोठ्या शिक्षिका त्यांच्या आईचा समावेश होता. मात्र, त्यांच्या आईने नकार दिला. त्या म्हणाल्या हे बघ, मी एक सामान्य माणूस आहे. मी कदाचित तुला जन्म दिला असेल, परंतु तुला त्या सर्वशक्तिमान शक्तीने शिकवले आहे आणि वाढवले आहे असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.