दांडी मारणारे भाजपचे खासदार अडचणीत; पंतप्रधान मोदींनी मागवली नावे
PM Narendra Modi Upset Over BJP MPs were absent in Rajya Sabha

दांडी मारणारे भाजपचे खासदार अडचणीत; पंतप्रधान मोदींनी मागवली नावे

सोमवारी (ता. 9) भाजपचे काही खासदार गैरहजर असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून संसदेत विरोधकांकडून दररोज गोंधळ घातला जात आहे. या गोंधळातच अनेक विधेयकं संमत केली जात आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच हिच स्थिती असल्यानं अनेक खासदार संसदेत गैरहजर राहत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये भाजप खासदारांचाही समावेश आहे. (PM Narendra Modi Upset Over BJP MPs were absent in Rajya Sabha)

सोमवारी (ता. 9) भाजपचे काही खासदार गैरहजर असल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. या खासदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून पंतप्रधान मोदी यांनी गैरहजर खासदारांची नावे मागवली आहेत. हा मुद्दा मंगळवारी झालेल्या पक्षाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला. सोमवारीच भाजपने सर्व राज्यसभा खासदारांना मंगळवारी व बुधवारी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, मंगळवारी झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतचे सादरीकरणह केले. त्यानंतर सर्व भाजप खासदारांनी उभे राहून टाळ्या वाजवत सात पदक विजेत्या खासदारांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन सर्व खासदारांना केले.

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनाच्या काळातील ही शेवटची बैठक होती. बैठकीत पंतप्रधानांनी विविध खेळाच्या स्पर्धांमधील खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच देशभरातील कुपोषणाची माहिती घेत गरिबांसाठीच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासही पंतप्रधानांनी सांगितले आहे. 

देशातील एकही गरीब कुटूंब आयुष्यमान भारत गोल्डन कार्डपासून वंचित राहता कामा नये. त्याआधारे त्यांना मोफत उपचार मिळू शकतील, असे पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेचा प्रसार वाढवावा. जेणेकरून प्रत्येक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकेल, असं पंतप्रधानांनी सांगितल्याचे जोशी यांनी नमूद केलं. 

Related Stories

No stories found.