दुर्गापूजेच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदींचे "चलो प. बंगाल'! - PM Modi starts campaign in West Bengal on the occasion of Durga Puja | Politics Marathi News - Sarkarnama

दुर्गापूजेच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदींचे "चलो प. बंगाल'!

मंगेश वैशंपायन
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

तः मोदींनी दुर्गापूजेच्या निमित्ताने बंगालच्या आगामी प्रचाराची पहिली तोफ उडविल्याचे मानले जाते.

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालचा लोकोत्सव असलेल्या दुर्गा पूजा समारंभाला ('पूजोर शुभेच्छा')पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिल्लीतून संबोधित केले व पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचाही शंखनाद केला.

यंदाची दुर्गापूजा राजकीय प्रचाराचे हत्यार बनविण्याचे भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून मोदींच्या या आभासी शक्तीपूजेतून भाजपलाही सत्तेची देवता प्रसन्न होईल असा पक्षनेत्यांचा विश्‍वास आहे. बंगाल भाजपने राज्यातील सर्व 294 मतदारसंघांमध्ये मोदींच्या भाषणाचे थेट प्रसारण केले. बंगालने देशाला कायम समस्येतून सुटण्याचा मार्ग दाखविला व अखंड भारतमातेचे पहिले चित्रही एका बंगाली सुपुत्रानेच (रवींद्रनाथ टागोर यांचे बंधू) चितारले होते हे मोदींनी आवर्जून सांगितले.

गेल्या वर्षी दुर्गापूजेवरूनच गृहमंत्री अमित शहा व ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार खटके उडाले होते. यंदा शहा प्रकृती अस्वास्थ्यामुळे बंगाल प्रचाराला किती वेळ देऊ शकतील याबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच स्वतः मोदींनी दुर्गापूजेच्या निमित्ताने बंगालच्या आगामी प्रचाराची पहिली तोफ उडविल्याचे मानले जाते. बंगालीतून भाषणाचा प्रारंभ करताना पंतप्रधान मोदींनी नारी शक्तीला व रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद व बंगालच्या महापुरूषांनाही नमन केले. त्यानंतर त्यांचे भाषण महिषासुर मर्दन व शस्त्र-अस्त्र या मार्गाने दुर्गापूजेवरून बंगालसाठी आपण किती आर्थिक मदत केली याकडे वळले. केंद्रातील आपल्या सरकारने कोलकत्यातील ईस्ट-वेस्ट मेट्रो कॉरिडोर परियोजनेला केंद्राने साडेआठ हजार कोटी रुपये दिले, 22 कोटी महिलांची बॅंकेत खाती उघडली, महिलांना सुलभपणे कर्ज मिळण्याची सोय केली, तीन तलाक कायदा करून मुस्लिम महिलांना शोषणातून मुक्त केले आदी योजनांची माहिती त्यांनी दिली.

प. बंगालमध्ये निवडणुकीच्या आधीच्या वर्षीची सार्वजनिक दुर्गा पूजा राजकीय स्वरूपाची असते. 2011 मध्ये डाव्यांच्या गडाला पहिला धक्का देण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेसनेही याच दुर्गा पूजेचे माध्यमच मुख्यतः वापरले होते याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात. भाजपने यंदा पक्ष म्हणून दुर्गा पूजा आयोजित केली असून एखाद्या राजकीय पक्षाच्या अधिकृत झेंड्याखाली राज्यात प्रथमच दुर्गापूजा होत आहे. भाजपने दुर्गा पूजांच्या राज्यभरातील मंडपांमध्ये पक्ष सदस्य नोंदणी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. याशिवाय मोदी सरकारच्या योजनांच्या जाहिराती करणारे मोठमोठे स्टॉलही भाजप ठिकठिकाणी लावणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख