देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार...पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी दरवाढीचा भडका उडाला आहे. आता पेट्रोल आणि डिझेलने विक्रमी कामगिरी केली आहे.
petroleum minister dharmendra pradhan says petrol and diesel prices will go down
petroleum minister dharmendra pradhan says petrol and diesel prices will go down

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दर कमी होतील, असे संकेत दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने ऐतिहासिक विक्रमी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिजे तेलाच्या भाव कमी असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकी पातळीवर गेले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. त्यानंतर दोन दिवस कोणतीही दरवाढ झाली नव्हती. 

आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 35 पैसै वाढ झाली असून, दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपयांवर गेले आहे. हा दिल्लीतील आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.34 रुपयांवर पोचला आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 81.32 रुपये आणि मुंबईत 88.44 रुपयांवर गेला आहे. 

इंधन दरवाढ कधी कमी होणार याबाबत बोलताना प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. ते थोड्या कालावधीत कमी होतील. कोरोनाच्या संकटामुळे तेल उत्पादनावर परिणाम झाला होता. जागतिक पातळीवर तेलाचा पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले होते. आता जागतिक पातळीवर भाव कमी होऊन देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भावही कमी होतील. 

पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश वस्तू व सेवा करात (जीएसटी) करावा, अशी मागणी आम्ही सातत्याने जीएसटी परिषदेकडे करीत आहोत. याचा फायदा अखेर जनतेला होणार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी परिषदेलाच घ्यावा लागेल, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 66 डॉलरवर गेला आहे. गेल्या वर्षी एप्रिल/मे महिन्यात खनिज तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांतील नीचांकी पातळी गाठली होती. त्यावेळी मोदी सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. पेट्रोलवर केंद्र व राज्याचा 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर आहे. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढले आहेत. या भाववाढीचा बोजा ग्राहकांवर पडत आहे. मात्र, सरकारने वाढवलेले कर कमी केलेले नाहीत. 

केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९ रुपये एवढा कर आकारत आहे. महाराष्ट्र सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होताना दिसत नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com