नितीश कुमारांनी आता भाजपला आणलं अडचणीत!

एनडीएमधील प्रत्येक पक्षाकडून काँग्रेससह विरोधकांवर टीका केली जात आहे. पण बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार यांनी भाजपलाच अडचणीत आणलं आहे.
नितीश कुमारांनी आता भाजपला आणलं अडचणीत!
Pegasus Project a probe should be done says CM Nitish Kumar

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला केली आहे. तसेच संसदेत यावर चर्चा करण्याचा आग्रहही विरोधकांनी धरला आहे. पण सरकारकडून दोन्ही मागण्या मान्य केल्या जात नसल्यानं संसदेचं कामकाज ठप्प झालं आहे. यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही विरोधकांच्या सुरात सुर मिसळत मोठं विधान केलं आहे. (Pegasus Project a probe should be done says CM Nitish Kumar)

पेगॅसस प्रकरणाचा भूतं केंद्र सरकारची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संसदेत विरोधी खासदारांकडून पेगॅससच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. पण सरकारचा नकार असल्यानं कोंडी निर्माण झाली आहे. 

एनडीएमधील प्रत्येक पक्षाकडून काँग्रेससह विरोधकांवर टीका केली जात आहे. पण बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार यांनी भाजपलाच अडचणीत आणलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. अनेक दिवसांपासून फोन टॅपिंगबाबत आपण ऐकत आहोत. संसदेत त्यावर चर्चा व्हायला हवी. विरोधक चर्चेचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे चर्चा करायलाच हवी, असं नितीश कुमार म्हणाले आहेत. 

नितीश कुमार यांच्या या भूमिकेमुळे भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. आता एनडीएतील मित्रपक्षही चौकशी मागणी करू लागल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संसदेत कोणत्याही मुद्यावर चर्चा होत नसल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सरकारकडून विरोधकांवर टीका केली जात असून चर्चेचं आवाहन केलं जात आहे. पण विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी राहुल गांधी सरसावले असून त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

मंगळवारी (दि. 2) संसदेतील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी बैठकीचं आमंत्रण दिलं आहे. संसदेजवळील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये सकाळी ही बैठक होणार आहे. तृणमूल काँग्रेसही या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सरकारच्या विरोधात एकत्रितपणे धोरण ठरवण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. राहुल गांधी यांच्याकडून सर्व नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या बैठकीला सुमारे 14 विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचं समजतं. 

बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षांचे खासदार व नेते संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आहे. पेगॅससच्या मुद्यावरून ते आक्रमक झाले असून सातत्यानं ट्विटरवरून सरकारवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे, पेगॅससच्या संभाव्य हेरगिरीच्या यादीत त्यांचे व निकटवर्तींयांचे मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.