मुलींवर पालकांनी नीट संस्कार केल्यास बलात्कार थांबतील...भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे

हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आता भाजप आमदाराने या प्रकरणी बलात्कारासाठीमुलींच्या पालकांनाच जबाबदार धरले आहे.
parents should teach daughters to behave decently says BJP MLA
parents should teach daughters to behave decently says BJP MLA

लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार तोंडघशी पडले आहे. यामुळे राज्य सरकारने अखेर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवली आहे. या प्रकरणावरुन एवढा गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजप आमदाराने बलात्कारासाठी मुलींच्या पालकांनाच जबाबदार धरले आहे. त्यांच्या विधानावरुन ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष्य होत आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

योगी आदित्यनाथ या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड चालवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीअंती हाथरसचे पोलीस अधीक्षक (एसपी), उपअधीक्षक (डीएसपी), पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. 

या प्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार अडचणीत आले आहे. असे असताना भाजपचे बलिया मतदारसंघातील आमदार सुरेंद्रसिंह यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकांनी मुलींवर संस्कार केल्यास बलात्कारच होणार नाहीत. बलात्कारासारख्या घटना केवळ संस्कारातून थांबू शकतात. शिक्षा अथवा तलवारीने असे प्रकार थांबू शकत नाहीत. सर्व माता-पित्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या तरुण मुलींना संस्कारी वातावरणात शालिनतेने वागणे शिकवायला हवे. 

सरकारचा धर्म हा संरक्षण करणे हा असून, कुटुंबाचा धर्म हा मुलांना चांगली मूल्ये शिकवणे हा आहे. सरकार आणि चांगली मूल्ये यांच्या संयोगातून आपण देश सुंदर बनवू, असेही सिंह यांनी म्हटले आहे. सिंह यांच्या विधानावरुन सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात लक्ष्य झाले आहेत. मुलींवर संस्कार करायला शिकवण्याऐवजी मुलांवर योग्य संस्कार व्हायला हवेत, हे आधी आमदारांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांना सोशल मीडियावर देण्यात आला आहे. 

या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी 2 ऑक्टोबरला कार्यकर्त्यांसह हाथरसकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली होती. या दोघांना अटक करण्यात आली होती. नंतर दोघांची पोलिसांनी सुटका केली होती. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अडवून पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. पोलिसांनी डेरेक ओब्रायन यांना धक्काबुक्की करीत जमिनीवर पाडले होते.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी 3 ऑक्टोबरला पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. जगातील कोणतीही शक्ती पीडितेच्या कुटुंबीयांचा आवाज दाबू शकत नाही, असे राहुल यांनी या वेळी भाजप सरकारला ठणकावले होते. यानंतर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, कुटुंबीयांना मुलीचे शेवटचे दर्शनही घेऊ दिले नाही. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरणी जबाबदारी स्वीकारावी. जोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com