Opposition parties submit no confidence motion against Rajya Sabha deputy chairman
Opposition parties submit no confidence motion against Rajya Sabha deputy chairman

ब्रेकिंग : राज्यसभा उपसभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले असताना मोदी सरकारने अखेर ती मंजूर करण्यात यश मिळविले आहे. या विधेयकांवरुन विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात आली. विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच सरकारने आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर केली. या विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन सुरू असलेला गदारोळ संपलेला नाही. या विधेयकांच्या मंजुरीवेळी उपसभापती हरिवंशसिंह यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ केला. सभापतींसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

कृषी विधेयकांना विरोध करीत विरोधकांनी उपसभापतींसमोरील हौद्यात आणि सभागृहात ठाण मांडले होते. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांवर उत्तर देण्यास सुरूवात केल्यानंतर गोंधळ आणखी वाढला. कृषी मंत्र्यांचे उत्तर गोंधळामुळे सदस्यांना ऐकायला जात नव्हते. अखेर काही मिनिटांतच त्यांनी उत्तर संपल्याचे जाहीर केले. 

यामुळे विरोधी सदस्यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही सदस्यांनी उपसभापतींना हौद्यातून रूलबुकही दाखविले. विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेचे कामकाज एक दिवसासाठी तहकूब करावे, अशी मागणी केली. मात्र, उपसभापतींनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेतले. या वेळी विरोधकांची घोषणाबाजीही वाढली. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली. या वेळी विरोधी पक्षांतील अनेक सदस्य आणि भाजपचे सदस्यांमध्ये जुंपल्याचे चित्रही आज पाहायला मिळाले.  

या विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन उठलेला गदारोळ कायम आहेत. राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह यांनी आजच्या कामकाजात पक्षपातीपणा केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. उपसभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी दाखल केला आहे. यामुळे हा विधेयकांवरुन सुरू झालेला वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

याबद्दल बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल म्हणाले की, राज्यसभा उपसभापतींनी लोकशाही पद्धतींचे रक्षण करण्याची आवश्यकता असते. मात्र, आजचे त्यांचे वर्तन हे लोकशाही पद्धती आणि प्रक्रिया यांना बाधा पोचवणारे होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com