माझे वडील 'आयसीयू'त असताना मोदींशिवाय एकाही नेत्याने कॉल केला नव्हता!

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय लोक जनशक्ती पक्षाने घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या भूमिकेवरुन मोठा गदारोळ सुरू आहे.
Only narendra modi called me for support when my father was admitted to ICU says chirag paswan
Only narendra modi called me for support when my father was admitted to ICU says chirag paswan

नवी दिल्ली : केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून  (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. चिराग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करीत आहेत, असा आरोप भाजप नेते करीत आहेत. याला चिराग यांनी आता उत्तर दिले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भाजप नेत्यांनी एलजेपीमध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात एनडीएकडे गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहत होते. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नव्हते. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. भाजपकडून संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) विरोधात राजकारण सुरू आहे, अशी चर्चा सुरू आहे.  

यावर चिराग यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे वडील रामविलास पासवान हे आयसीयूत होते त्यावेळी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मला कॉल केला होता. इतर कोणत्याही नेत्याने त्यावेळी साधा कॉलही केला नव्हता. तर मग मी मोदींचा आदर का करु नये? मुख्यमंत्री नितीशकुमार भाजप आणि लोक जनशक्ती पक्षामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. पंतप्रधान मोदींसह भाजपच्या सर्व नेत्यांचे टीकेचे मी स्वागत करतो. 

काही दिवसांपूर्वी चिराग यांनी 'हनुमानभक्ती'चा दाखला दिला होता. त्यांनी म्हटले आहे की, मला निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरण्याची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत आणि मी त्यांच्या हनुमान आहे. गरज पडल्यास माझी छाती फाडून हे दाखवू शकतो. 

चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढणार असून, ते जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे ते प्रामुख्याने जेडीयूची मते खातील. मात्र, ते भाजपला पाठिंबा देणार आहेत. यामुळे भाजपला फायदाच होणार आहे. याचवेळी जेडीयूकडे जागावाटपात गेलेल्या मतदारसंघांतील नेते एलजेपीमध्ये गेले आहेत. यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले जात आहे. नितीश यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने चिराग पासवान यांना स्वबळाची चूल मांडण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे. 

चिराग यांच्या भूमिकेमुळे भाजप आणि जेडीयूमध्ये कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यामुळे भाजप नेत्यांनी अखेर चिराग यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. चिराग यांना आता भाजप नेते थेट लक्ष्य करु लागले आहेत. चिराग यांचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचे पक्षाचे नेते उघडपणे सांगू लागले आहेत. 

चिराग पासवान यांना भाजपचीच फूस असल्याची उघड चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सत्ताधारी एनडीएमध्ये तणाव निर्माण झाला आहे. आता चिराग पासवान यांच्या विरोधात भाजपला कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत चिराग पासवान यांच्याविरोधात थेट बोलणे टाळले होते. चिराग यांच्या या विधानाने भाजप नेत्यांची आणखीनच कोंडी झाली आहे. चिराग यांना काय उत्तर देणार हाच मोठा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com