बिहारमध्ये दुपारी 12.15 पर्यंत फक्त 15 टक्के मतांचीच मोजणी... मतमोजणीला का होतोय उशीर...? - only around 15 per cent of the votes had been counted as of 12 pm | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये दुपारी 12.15 पर्यंत फक्त 15 टक्के मतांचीच मोजणी... मतमोजणीला का होतोय उशीर...?

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची निकालाची उत्सुकता असून, चालू मतमोजणीत  महाआघाडीपेक्षा राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे पारडे जड दिसत आहे.  

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) सर्वांत मोठा धक्का बसला आहे. मात्र, भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एनडीए आघाडीवर असली तरी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने कोणताही राजकीय पक्ष अद्याप जल्लोष करताना दिसत नाही. मतमोजणीला विलंब होण्याचे कारण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

मतमोजणीत दुपारी एक नंतर एनडीएला एकूण 127 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा सहाने वाढलेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 106  जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा चारने कमी झालेल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू  48 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 74 जागा, राष्ट्रीय जनता दल 66, काँग्रेस 21, लोक जनशक्ती पक्षाला एक जागा असा कल दिसत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मतमोजणीवर परिणाम झाल्याचे पहिलेच उदाहरण बिहारमध्ये घडत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या वेळी मतमोजणी केंद्रांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतमोजणी टेबलांची संख्या तेवढीच ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर राखण्यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची संख्या 72 हजार 723 वरुन 1 लाख 6 हजार 515 वर नेण्यात आली आहे. 

मतमोजणीचे 35 फेऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारनंतर स्पष्टपणे कल दिसू शकेल. आज दुपारी 12.15 वाजेपर्यंत केवळ 15 टक्केच मतांची मोजणी झाली होती, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

जेडीयूचे नेते पक्षाच्या जागा कमी झाल्याचे मान्य करीत असले तरी ब्रँड नितीशला धक्का पोचला नसल्याचे सांगत आहेत. दुय्यम स्थानी असलेला भाजप आता पहिल्या स्थानी पोचल्याचे चित्र आहे. याचवेळी राज्यात जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.  भाजपला जास्त जागा पदरात पडतील असे चित्र असून, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील का, याबाबत भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी या प्रकरणी सूचक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेमुळे या निवडणुकीत आम्ही तरलो. सरकार स्थापना आणि नेतृत्वाच्या निर्णयावर सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार राहणार हे आधीच ठरलेले असताना आता नेतृत्वाची चर्चा कशाला असा प्रश्न विचारला जात आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख