एक देश, एक निवडणूक आवश्‍यक : मोदी यांचा पुनरुच्चार - one nation one election need of the time says PM Modi | Politics Marathi News - Sarkarnama

एक देश, एक निवडणूक आवश्‍यक : मोदी यांचा पुनरुच्चार

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

राज्यघटना दिनानिमित्त गुजरातमधील सरदार पटेल पुतळ्याच्या परिसरात पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद

नवी दिल्ली : ‘एक देश, एक निवडणूक’ या आपल्या कल्पनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आग्रह धरला आहे. राज्यांच्या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समारोप करताना मोदींनी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत संपूर्ण डिजीटायझेशन व `एक देश, एक निवडणूक` या ‘लक्ष्यां’च्या दिशेने आम्ही आता अग्रेसर व्हायला हवे, असे सांगितले. आजच्या दिवशी, १२ वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे घाव आम्ही विसरू शकणार नाहीत, असे सांगितले.

राज्यघटना दिनानिमित्त गुजरातमधील सरदार पटेल पुतळ्याच्या परिसरात ही परिषद भरली आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीकडे जाताना आम्हाला काही लक्ष्ये निश्‍चित करावी लागतील. भारताला आज एक देश एक निवडणुकीची गरज आहे. दर काही महिन्यांनी निवडणुका होत रहातात. संपूर्ण डिजिटायझेशनकडे आम्ही जायला हवे.

‘‘सरदार सरोवरच्या ज्या भागात तुम्ही आहात त्या धरणाने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या चार राज्यांच्या शेतीला व नागरिकांनाही फार मोठे फायदे झाले आहेत. खरे तर हे काम अनेक वर्षांपूर्वी झाले असते तर, जनतेला पाण्यासाठी इतके ताटकळत रहावे लागले नसते. ज्यांनी हा प्रकल्प लटकावला त्यांना या राष्ट्रीय नुकसान केल्याबद्दल पश्‍चात्तापही होत नाही. अशा प्रवृत्तींना आम्हाला देशातून बाहेर काढायचे आहे,’’ असा हल्ला त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता चढवला.

पंतप्रधान म्हणाले, ‘‘राज्यघटनेवर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न गेल्या ७० वर्षांत झाले व सत्तरीच्या दशकात तर घटनेवर हल्लाच झाला. पण घटनेनेच त्यांना उत्तर दिले. आणीबाणीनंतर आमची व्यवस्था मजबूत होत गेली. घटनेच्या रक्षणात ‘विधायिका’ या स्तंभाची महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक नागरिकाने घटना समजून घेऊन त्यानुसार वागावे. विधानसभांच्या कामकाजातही लोकांची भागीदारी कशी वाढेल याचे प्रयत्न व्हावेत. एखाद्या विशेष विषयावर सभागृहात चर्चा असेल तर, त्या क्षेत्रातील लोकांना बोलावून घ्यायला हवे. घटनेवर विश्‍वास असल्यानेच कोरोना काळात देशवासीयांनी केंद्राच्या उपायांना पाठिंबा दिला. या काळात संसदेत जास्त कामकाज झाले व खासदारांनीही आपल्या वेतन-भत्यांत कपात मंजूर केली. कोरोना काळातच अनेक निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या व घटनेची ताकद आणखी वाढली.’’
नागरिकांचा आत्मसन्मान व आत्मविश्‍वास वाढावा ही घटनेची अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न असतो, असेही मोदी यांनी सांगितले.

`मुंबईवरील घाव विसरू शकत नाही’

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला बारावर्ष झाल्यानिमित्त त्यात प्राण गमावलेले देशविदेशातील नागरिक व पोलिस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी २००८ मध्ये आजच्याच दिवशी मुंबईवर सर्वांत भीषण हल्ला केला होता. ते घाव आम्ही कधी विसरू शकत नाही. भारत आज नवनव्या तंत्राने दहशतवादाचा मुकाबला करत आहे. मुंबईसारख्या हल्ल्यांचे प्रयत्न आपण आज निष्फळ करत आहोत. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या सुरक्षादलांनाही मी वंदन करतो.’’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख