गुड न्यूज : आता भारतीयांना मॉडर्नाची लसही मिळणार - now moderna covid vaccine will be available in india | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : आता भारतीयांना मॉडर्नाची लसही मिळणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 जून 2021

देशात लशीची टंचाई असून, यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने विदेशी कंपन्यांसाठी दारे खुली केली आहेत. 
 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (covid vaccination) भर दिला आहे. देशात लशीची टंचाई असून, यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने विदेशी कंपन्यांसाठी दारे खुली केली आहेत. आता मॉडर्ना (Moderna) कंपनीची लसही भारताला उपलब्ध होणार आहे. या लशीच्या तातडीच्या मर्यादित वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

मॉडर्नाची लस आयात करण्याची परवानगी सिप्ला कंपनीला देण्यात आली आहे. अमेरिकेसारख्या देशात तातडीच्या वापरास परवानगी मिळाली आहे, अशा कोरोना लस उत्पादक विदेशी कंपन्यांना परवानगी देण्याची भूमिका भारताने घेतली आहे. याचबरोबर या लशीच्या पहिल्या 100 लाभार्थ्यांचा डेटा सादर केल्यासही लशीच्या तातडीच्या वापरास परवानगी दिली जात आहे. मॉडर्नाची लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी आढळली आहे. 

फायझरप्रमाणे मॉडर्नाची लस ही एमआरएनए प्रकारातील आहे. फायझरची कोरोना लसही लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. भारतात या लशीला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बॉरला यांनीच ही माहिती दिली होती. त्यामुळे मॉडर्नापाठोपाठ फायझरही भारतीयांसाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे. 

हेही वाचा : लसीकरणाचा गोंधळ..तेरा वर्षांच्या मुलाला लस देण्याचा विक्रम

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख