मीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या मवाली! - Not farmers they are hooligans says BJPs Meenakshi Lekhi | Politics Marathi News - Sarkarnama

मीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या मवाली!

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जुलै 2021

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी बोलताना गुरुवारी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली. त्यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख मवाली असा करत हिणवलं. दरम्यान, गुरूवारपासून शेतकऱ्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केलं आहे. (Not farmers they are hooligans says BJPs Meenakshi Lekhi)

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जवळपास आठ महिने झाले असले तरी अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही. पण तिन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे. कोरोना काळातही अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनात सहभागी होत आहेत. तर गुरूवारपासून या शेतकऱ्यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलं आहे. अधिवेशन सुरू असेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा : शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसला मिनी विधानसभेतच कळेल आपली ताकद

या आंदोलनाविषयी मीनाक्षी लेखी यांना गुरूवारी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी 'त्यांना शेतकरी का म्हणता, ते मवाली आहेत मवाली,' असं म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये लेखी यांनाही स्थान मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

लेखी यांच्या या वक्तव्यावर बोलताना शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी संयमी भूमिका घेतील. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, मवाली नाही. देशभरातून आलेले शेतकरी दिल्लीच्या सीमांवर अहिंसक मार्गाने आंदोलन करत आहेत, असे टिकैत यांनी सांगितले. 

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी २०० शेतकरी आजपासून दररोज जंतरमंतरवर प्रतिरूप संसद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी लेखी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुढील आंदोलनादरम्यान या वक्तव्याचे पदसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टिकैत यांनी संयमी भूमिका घेतली असली तरी इतर शेतकरी संघटनांकडून अद्याप त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख