किम जोंग उन पुन्हा अवतरला पण डोक्याच्या पाठीमागे बँडेज अन् रहस्यमयी डाग

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याच्या प्रकृतीबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
north korean dictator kim jong un seen with bandage behind his head
north korean dictator kim jong un seen with bandage behind his head

प्योगाँग : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याच्या प्रकृतीबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमाने किम याची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामुळे किम याच्या प्रकृतीबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 

सरकारी माध्यमाने जाहीर केलेल्या छायाचित्रांमध्ये किम हा सैन्याच्या एका कार्यक्रमाला 24 ते 27 जुलैदरम्यान हजेरी लावताना दिसत आहेत. यात किम याच्या डोक्याच्या पाठीमागे बँडेज दिसत आहे. नंतरच्या छायाचित्रांमध्ये त्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस असलेले बँडेज गायब असले तरी तेथे हिरवट डाग दिसत आहे. यामुळे किम याच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

जून महिन्यात किम याची सरकारी माध्यमाने छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्यात किम याची प्रकृती खालावलेली दिसली होती. त्याचे वजनही कमी झालेले दिसले होते. मे महिन्यात मात्र, किम हा सार्वजनिक ठिकाणी दिसला नव्हता. मागील वर्षीही किम बराच काळ सार्वजनिक जीवनापासून दूर होता. त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात तो एका खत कारखान्याच्या भेटीवर दिसला होता. त्यावेळी त्याच्या मनगटावर काही खुणा होता. वैद्यकीय उपचाराच्याच त्या खुणा असल्याचा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता. 

किम जोंग उन याने लहान बहीण किम यो जोंग हिला अघोषित उपाध्यक्ष बनविल्याचे वृत्त दक्षिण कोरियातील गुप्तचर संस्थेने गेल्या वर्षी दिले होते. तिच्याकडे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्याबरोबरील संबंधांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले होते. किम याच्यावरील ताण कमी व्हावा आणि देशातील परिस्थितीबाबत अपयश आल्यास दोष पत्करावा लागू नये, असे हेतू यामागे आहेत, असेही म्हटले होते. त्यावेळीही किम जोंग याच्या प्रकृतीबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. तो कोमात गेल्याची चर्चाही सुरू झाली होती.  

गेल्या वर्षी दक्षिण कोरियाच्या सीमेजवळील काएसाँग गावात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण मिळताच किम जोंग उन याने आणीबाणी लागू करून ते गावच लॉकडाऊन केले होते. ही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आल्याचे नंतर जाहीर करण्यात आले आहे. देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. मात्र, जागतिक पातळीवर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. किम याने त्यावेळी बोलताना कोरोनाचा देशात शिरकाव झाला असे वाटते, पण यास दक्षिण कोरियातून परतलेला घुसखोर जबाबदार असल्याचा दावा केला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com