किम यांनी केले होते ट्रम्प यांच्यासमोर मोठे गुपित उघड - north korea dictator kim jong un discloses his secretes to donlad trump | Politics Marathi News - Sarkarnama

किम यांनी केले होते ट्रम्प यांच्यासमोर मोठे गुपित उघड

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल धक्कादायक दावे एका अमेरिकी पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आले आहेत. यावरुन अमेरिकेत मोठा गदारोळ उडाला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी धक्कादायक माहिती उजेडात आणणाऱ्या पुस्तकावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. कोरोनाविषाणू, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, वांशिक अशांतता आणि अमेरिकेचे नवे गूढ शस्त्र अशा अनेक विषयांवरील ट्रम्प यांचे विचार, मते व वक्त्यव्ये या पुस्तकात आहेत. अमेरिकेचे पत्रकार बॉब वुडवर्ड यांच्या ‘रेज’ या पुस्तकातून ही माहिती समोर आली आहे.

वुडवर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या १८ मुलाखती घेतल्या आहेत. वुडवर्ड हे वॉशिंग्टन पोस्टचे सहयोगी संपादक आहेत. त्यांच्या पुस्तकातून ट्रम्प यांच्याबद्दल खळबळजनक माहिती उघड झली आहे. कोरोना हा घातक व संसर्गजन्य रोग असल्याचे ट्रम्प यांना माहिती होते, तरीही ते कोरोना हा सामान्य आजार असल्याचे ते जनतेला जाहीरपणे सांगत राहिले. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. या भेटीत उन यांनी त्यांच्या काकांची हत्या कशी केली, हे गुपितही ट्रम्प यांच्यासमोर उघड केले होते, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

किम जोंग उन यांची २०१८ मध्ये सिंगापूरमध्ये ट्रम्प यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यावेळी ते खूप प्रभावित झाले होते. किम हे अत्यंत हुशार नेते असल्याचे तेव्हा ट्रम्प यांच्या लक्षात आले. किम त्यांनी स्वतःच्या काकाची हत्या कशी केली याचे तपशीलही ट्रम्प यांना दिले होते. असा दावा खुद्द ट्रम्प यांनीचे केल्याचे पुस्तकात म्हटले आहे. उत्तर कोरिया अण्वस्त्र कार्यक्रम कधीही थांबविणार नाही, ही ‘सीआयए’ या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची माहिती ट्रम्‍प यांनी खोडून काढली होती. उत्तर कोरियाचा प्रश्‍न कसा हाताळायचा हे गुप्तचर यंत्रणेला समजत नसल्याचे ते म्हणाले होते.

कोरोनाबाबत ट्रम्‍प यांनी जनतेला सावध केले नाही, ही बाब या पुस्तकातून उघड झाल्यानंतर ट्रम्प यांना याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, देशाला खूष ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मी माझ्या देशावर प्रेम करतो आणि देशवासीयांनी भीतीच्या छायेखाली जगावे, अशी माझी इच्छा नाही. मी देशात कोणत्याही प्रकारचे घबराटीचे वातावरण निर्माण करू इच्छित नव्हतो.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख