दिल्ली हिंसाचारानंतर जहांगीरपुरीत अनधिकृत दुकानं, घरांवर बुलडोझर

Delhi| Voilence| राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दिल्ली हिंसाचारानंतर जहांगीरपुरीत अनधिकृत दुकानं, घरांवर बुलडोझर
Encroachment action in JahangirpurTwitter/@ANI

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या हिंसाचाराच्या घटनेनंतर दिल्ली महापालिकेच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांपासून जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई सुरु आहे. तोडकाम सुरु असलेल्या ठिकाणी घटनास्थळी 400 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

या घटनेनंतर दिल्लीतील भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहीत जहांगीरपुरीतील दंगलखोरांनी अनधिकृत बांधकामं उभी केल्याचा दावा करत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर दिल्ली महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली. बुलडोझरच्या सहाय्याने जंहांगीरपुरी भागातील अनधिकृत दुकाने, घरे तोडली जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे.

Encroachment action in Jahangirpur
महापालिका निवडणुकीमुळे मुख्यमंत्री अडचणीत! निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना आणि विशेष पोलीस आयुक्त दिपेंद्र पाठक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दिपेंद्र पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईआधी तेथील स्थितीचा आढावाही घेतला होता. त्यानुसार घटनास्थळी ४०० जवान तैनात करण्यात आले आहेत.

हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात मिरवणुकीवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी अनेक वाहने पेटवून दिली. तर आठ-दहा पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहेत.

दरम्यान, जहांगीरपुरीतील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडकाम कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेकडून तोडकामाची कारवाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थिगीतीच्या आदेशानंतरही कारवाई सुरु असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.