धक्कादायक : 'आरोग्य सेतू'ची सक्ती...पण अॅप बनवले कुणी हेच माहिती नाही! - no information about who created arogya setu application | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : 'आरोग्य सेतू'ची सक्ती...पण अॅप बनवले कुणी हेच माहिती नाही!

मंगेश वैशंपायन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आरोग्य सेतू अॅपसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. आता अॅपवरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : कोरोना काळात केंद्र सरकार आरोग्य सेतू हे मोबाईल अॅप्लिकेशनसाठी अतिशय आग्रही आहे. मात्र, हे अॅप कोणी बनवले, याची माहिती देण्यास राष्ट्रीय माहिती केंद्राकडेच (एनआयसी) नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारांतर्गत याबाबतच्या प्रश्‍नांना एनआयसीने मोघम उत्तरे दिल्याबद्दल केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान (दूरसंचार) मंत्रालयांना कारणे दाखवा नोटीस नुकतीच बजावली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते सौरव दास यांनी आरोग्य सेतूचा जनक कोण, हा प्रश्‍न विचारला होता. मात्र मंत्रालयांसह संबंधित संस्थांनी त्याबाबत काहीही माहिती नसल्याची भूमिका घेतली आहे. दास यांचा अर्ज दोन महिने या मंत्रालयाकडून त्या विभागाकडे असा फिरत राहिला. अखेरीस त्यांना हे उत्तर मिळाले होते. त्यानंतर त्यांनी सीआयसीकडे धाव घेतली होती. आता सीआयसीने संबंधितांना नोटीस बजावली आहे. माहिती देण्यास अडथळे निर्माण करणे व मोघम उत्तर दिल्याबद्दल कारवाई का करु नये? अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.

आरोग्य सेतू अॅपवर ज्या तंत्रज्ञान मंत्रालयाचे व एनआयसीचे नाव आहे त्यांनाच याबाबतची प्राथमिक माहिती नसल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे. देशातील कोट्यवधी नागरिक ज्या मोबाईल अॅपचा स्वेच्छेने अथवा सक्तीने वापर करत आहेत त्याबाबतची इतकी प्राथमिक माहिती तुम्हाला नाही का ? आणि असेल तर ज्यांनी ती मागितली त्यांना ती देण्यास टाळाटाळ का केली जाते ? अशा स्वरूपाचे प्रश्‍न सीआयसीने उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, आरोग्य सेतू डाऊनलोड केले नसेल तर अनेक मंत्रालयांत प्रवेशच मिळत नाही हा दिल्लीत वारंवार येणारा अनुभव आहे. या स्थितीत हे अॅप कोणी विकसित केले याची माहिती नाही, असे सांगून कानावर हात ठेवणाऱ्या संबंधितांना कारणे दाखवा नोटिशीचे उत्तर द्यावे लागणार आहे. दरम्यान, या अॅपचा गवगवा झाल्यावर पाकिस्तानसह शेजारी शत्रूराष्ट्रांच्या हॅकरचीही वक्रदृष्टी त्याकडे वळल्याचेही समोर आले होते. त्यामुळेच एनआयसीने सुरक्षेसाठी माहिती अधिकारांतर्गत स्पष्ट उत्तर देण्याचे टाळल्याचीही चर्चा आहे.

आरोग्य सेतू हे कोरोनाबाधितांचा माग काढण्यासाठी (कॉन्ट्रॅक्‍ट ट्रेसिंग) उपयुक्त  अॅप असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळेच सर्व मंत्रालये, सरकारी विभाग, वाहतुकीची साधने यामध्ये हे अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सक्तीबद्दल आरडाओरड झाल्यावर 'हे अॅप वापरण्याचा आग्रह लोकांना करावा' अशी छपाई दुरूस्ती संबंधित सूचनांमध्ये करण्यात आली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख