जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी करणाऱ्या महाकाय जहाजाच्या नशिबी हेलकावेच...

महाकाय एव्हर गिव्हन हे मालवाहू जहाज सुएझ कालव्यात अडकल्याने जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी झाली होती.
No court decision on Suez Canals claim over Ever Given vessel
No court decision on Suez Canals claim over Ever Given vessel

सुएझ : सुएझ कालव्यात (Suez Canal) अडकलेले महाकाय एव्हर गिव्हन (Ever Given) हे मालवाहू जहाज सुमारे आठवडाभरानंतर 29 मार्चला दुसरीकडे हलवण्यात यश आले होते. यामुळे जगातील सर्वांत मोठी जलवाहतूक कोंडी अखेर सुटली होती. परंतु, नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर या जहाजाची झालेली कोंडी अजूनही कायम आहे. या जहाजामुळे झालेल्या नुकसानीबाबत निर्णय देण्यास इजिप्तमधील (Egypt) अपिलीय न्यायालयाने असमर्थता दर्शवली. 

एव्हर गिव्हन हे 2 लाख टनांचे महाकाय जहाज 23 मार्चला सुएझ कालव्यात अडकले होते. आठवडाभरानंतर म्हणजेच 29 जुलैला अथक प्रयत्नांनंतर हे जहाज अखेर बाहेर काढण्यात यश आले होते. या जहाजामुळे आशिया आणि युरोपकडे दररोज जाणाऱ्या तब्बल 9.6 अब्ज डॉलरच्या मालाची वाहतूक थांबली होती. याचबरोबर सुएझ कालवा बंद पडल्याने इजिप्तला दररोज सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलरचा फटका बसला होता. 

हेही वाचा : सुएझ कालव्यात जहाज अडकण्यास प्राधिकरण जबाबदार 

आता या नुकसानामुळे  सुएझ कालवा प्राधिकरणाने हे जहाज रोखून धरले आहे. एकप्रकारे हे जप्त केले असून, जहाजाच्या कंपनीकडे तब्बल 90 कोडी डॉलरची मागणी केली होती. कंपनीने ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने हे जहाज कालवा प्राधिकरणाने जप्त केले आहे. दरम्यान, जहाजाची कंपनी शोई कायसेन कैशा, कालवा प्राधिकरण आणि विमा कंपनी यांच्यात यावर चर्चा होती. यातून तोडगा न निघाल्याने प्रकरण न्यायालयात गेले आहे .    

अपिलीय न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देण्यास असमर्थता दर्शवली आहे. हे प्रकरण आपल्या कार्यकक्षेत येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सुएझ कालवा प्राधिकरण आणि  शोई कायसेन यांच्यातील नुकसान भरपाईचा तोडगा निघेपर्यंत एव्हर गिव्हन जहाज जप्त करण्याची वैधता तपासण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात जावे, असे निर्देश अपिलीय न्यायालयाने दिले आहेत. 

अडकून पडलेल्या जहाजाला बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. सुरवातीला जहाजाचा कमी पाण्यात अडकून बसलेला पुढील भाग मोकळा झाला होता. तरीही कालव्यातून हे जहाज बाहेर काढणे अतिशय कठीण बाब होती. हे जहाज बाहेर काढण्याचे काम स्मिट सॅल्व्हेज ही कंपनी करीत होती. पुढील मोहिमेसाठी भरतीची प्रतीक्षा होती. भरती आल्यानंतर हे जहाज बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आणि अखेर ते यशस्वी झाले होते. जहाज पूर्णपणे सरळ होऊन ते सुएझ कालव्यातून पुढे रवाना झाले होते. 

एव्हर गिव्हन हे महाकाय जहाज 400 मीटर (1 हजार 300 फूट) लांबीचे आहे. या जहाजातील सर्वच्या सर्व कर्मचारी भारतीय आहेत. जगातील सर्वाधिक व्यग्र असलेला जलवाहतूक मार्ग या जहाजाने सुमारे आठवडाभर रोखून धरला होता. यामुळे दररोज 9.6 अब्ज डॉलरचा माल अडकून पडला होता. याचाच परिणाम होऊन अनेक जहाजे समुद्रात अडकून पडली होती. काही जहाजांनी लांबचा आफ्रिकेचा मार्ग स्वीकारला होता. ही कोंडी अखेर सुटली होती.  

जागतिक जलवाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यातील वाहतूक आता सुरळीत झाली आहे. जगातील १२ टक्के मालवाहतूक ही सुएझ कालव्यामार्गे होते. या कालव्यात एव्हर गिव्हन आडवे अडकल्याने हा मार्ग बंद झाला होता. यामुळे मार्गाच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ सुमारे ३०० मालवाहू व तेलवाहू जहाजांची मोठी रांग लागली आहे. कोरोना संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यातच या जहाजामुळे व्यापारी जलवाहतूक ठप्‍प झाली. काही मालवाहू जहाजांनी पुढे जाण्यासाठी सुएझऐवजी आफ्रिकेतील दक्षिण भागातून जाणारा लांब पल्ल्याच्या व खर्चिक मार्गाचा पर्याय निवडला होता. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com