मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा पण नितीशकुमार पडले भारी..! - nitish kumar takes hold of home and human resource ministry | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा पण नितीशकुमार पडले भारी..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

बिहारमधील सत्तास्थापनेनंतर आता मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे गृह मंत्रालय आले असून, काही महत्वाची खाती भाजपकडे गेली आहेत.  

पाटणा : बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये भाजपचाच वरचष्मा राहणार हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गृह विभागासारखे महत्त्वाचे खाते स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. काही महत्वाच्या खात्यांचे दान मात्र, भाजपच्या पदरात पडले आहे. विधानसभेचे अध्यक्षपदही संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) भाजपकडे गेले आहे. 

बिहारमध्ये भाजपच्या जागा अधिक असून, जेडीयूच्या जागा कमी आहेत. त्यामुळे एनडीएतील सत्ता समीकरण बदलले आहे. मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार असले तरी महत्वाची खाती भाजपकडे गेली आहेत. सर्वसाधारणपणे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच खात्यांचे वाटप होते. परंतु, मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० तासांनंतर त्यांना खात्याचा कारभार सोपविण्यात आला.  बिहारमध्ये असे पहिल्यांदाच घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. गृह आणि मनुष्य बळ विकास मंत्रालयावर भाजपने दावा सांगितला होता. नितीशकुमार यांनी मात्र, ही खाती भाजपसाठी सोडण्याची तयारी दर्शविली नव्हती. महत्वाच्या खात्यांमुळे या खाते वाटपाला विलंब झाला. 

राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यापासून भाजपला रोखण्यातही नितीशकुमार अपयशी ठरले आहेत. नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात १४ मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी १६ नोव्हेंबरला झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्र्यांना खाते वाटप केले. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी नवे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मोदी अर्थ आणि पर्यावरण विभाग पाहत होते. दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना मागास कल्याण विभाग, उद्योग आणि पंचायती राज विभागाची जबाबदारी दिली आहे. 

असे आहे मंत्रिमंडळ 

मुख्यमंत्री नितीश कुमार : गृह व मनुष्यबळ  
उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद : अर्थ आणि पर्यावरण 
उपमुख्यमंत्री रेणू कुमारी : मागास कल्याण विभाग, उद्योग आणि पंचायती राज 
विजय चौधरी : ग्रामीण विकास आणि ग्रामीण कार्य 
विजेंद्र प्रसाद यादव : उर्जा, दारुबंदी आणि नियंत्रण 
रामसूरत राय : महसूल 
जिवेश कुमार : पर्यटन आणि श्रम मंत्रालय 
मेवालाल चौधरी : शिक्षण 
मंगल पांडेय : आरोग्य व रस्ते बांधणी 
शीला कुमारी : वाहतूक 

Edited by Sanjay Jadhav

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख