मित्राच्या विजयाचं नितीशकुमारांना मोठं कौतुक..! - nitish kumar says sushil kumar modi has done lot of service to bihar | Politics Marathi News - Sarkarnama

मित्राच्या विजयाचं नितीशकुमारांना मोठं कौतुक..!

वृत्तसंस्था
सोमवार, 7 डिसेंबर 2020

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सुशीलकुमार मोदी बिनविरोध निवडून गेले  आहेत. 

पाटणा : भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना बिहारचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले नव्हते. यामुळे नाराज असलेल्या मोदींना भाजपने राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांचे पुर्नवसन केले होते. मोदींच्या विरोधात महाआघाडीने उमेदवारच दिला नव्हता. यामुळे अखेर मोदी हे बिनविरोध राज्यसभेवर गेले आहेत. मोदींना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार हे स्वत: हजर होते. मित्राच्या विजयाचा आनंद त्यांना या वेळी लपवता आला नाही. या वेळी दोघांनीही एकमेकांचे गोडवे गायले. 

भाजपने उपमुख्यमंत्रिपदी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांची निवड केली होती. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री देण्यात आले नव्हते. याबद्दल मोदी यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत होती. 

या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदींना उमेदवारी दिली होती. भाजपने एकाच वेळी मोदींचे पुनर्वसन आणि चिराग पासवान यांना झटका देण्याची चाल खेळली होती. यामुळे पासवान यांना मोठा धक्का बसला होता. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 3 डिसेंबर  होती. या जागेसाठी 14 डिसेंबरला मतदान होणार होते. 

मोदींच्या विरोधात महाआघाडीने उमेदवारच दिला नव्हता. अपक्ष म्हणून श्याम नंदन प्रसाद यांनी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरला होता. प्रसाद यांच्या अर्जासोबत विधानसभेच्या किमान दहा सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र नव्हते. यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरला होता. आज राज्यसभेसाठीचे अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. मात्र, इतर कोणाचा अर्ज न आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

या वेळी मोदींनी नितीश यांच्यासोबत 15 वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना बरेच काही शिकल्याची कबुली दिली. नितीशकुमार यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे सुशीलकुमार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देणे भाजपने नाकारल्याची चर्चा मागील काही काळ सुरू होती. मोदींना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले त्यावेळी मुख्यंत्री नितीशकुमार हे स्वत: हजर होते. त्यांच्यासोबत भाजप नेते व उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उपस्थित होते.  

या वेळी बोलताना नितीशकुमार यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, सुशील मोदी यांनी बिहारची खूप सेवा केली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली देशाची सेवा करतील. केंद्र सरकारचे सहकार्य बिहारला मिळत असून, पुढेही ते मिळत राहील. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख