माझ्या मुलाला केंद्रीय मंत्रिमंडळात घ्या, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा! - nishad party chief sanjay nishad warns bjp over union cabinet expansion | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या मुलाला केंद्रीय मंत्रिमंडळात घ्या, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करण्यात आला आहे. यात निशाद पक्षाला स्थान देण्यात आलेले नाही.  

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करण्यात आला आहे. यात उत्तर प्रदेशात भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या निषाद पक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. याचवेळी अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांचा मात्र समावेश करण्यात आला आहे. यावरुन निषाद पक्षाने उघड इशारा दिला असून, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळात निषाद पक्षाला स्थान देण्यात आलेले नाही. हा पक्ष उत्तर प्रदेशातील सरकारमध्ये भाजपचा सहकारी पक्ष आहे. यावरु पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय निषाद म्हणाले की, माझा मुलगा व खासदार प्रवीण निषाद याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. याचवेळी अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांना स्थान दिले आहे. पटेल यांना मंत्रिपद मिळत असेल तर प्रवीण निषाद यांना का नाही? भाजपने चूक दुरुस्त केली नाही तर निषाद समाजाचे लोक भाजपच्या विरोधात जातील. याचे परिणाम भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील. 

प्रवीण निषाद यांची लोकप्रियता तब्बल 160 विधानसभा मतदारसंघात आहे. तर अनुप्रिया पटेल यांचा प्रभाव केवळ काही मतदारसंघापुरता आहे. आम्हाला केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याने  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपते राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे मी आक्षेप नोंदवला आहे. आता निर्णय घेण्याची त्यांची वेळ आहे. ते प्रवीण निषाद यांच्याबाबत योग्य निर्णय घेतील, अशी आशा मला आहे, असे संजय निषाद यांनी सांगितले. 

योगींनाही दिला होता इशारा 
काही दिवसांपूर्वीच निशाद पक्षाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही इशारा दिला होता. भाजपने 2022 च्या निवडणुकीत आपल्याला उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी संजय निषाद यांनी केली होते. भाजपने असे केले नाही, तर त्यांना राजकीय नुकसान सहन करावे लागेल, अशी इशारा त्यांनी दिला होता. 

निषाद पक्षामुळे पंचायत निवडणुकांत भाजपला फटका 
उत्तर प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये निषाद पक्षाला डावलल्याने भाजपला नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे संजय निषाद यांच्याकडून भाजपवर दबाव टाकण्यास सुरूवात कऱण्यात आली आहे. निषाद पक्षाचा उत्तर प्रदेशातील 169 जागांवर प्रभाव आहे. त्यामुळे आपल्या जाण्यामुळं भाजपला निवडणुकीत नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला होता. 

हेही वाचा : नितीशकुमारांनी 2019 मध्ये जे बाणेदारपणे नाकारलं तेच 2021 मध्ये पदरात पाडून घेतलं 

उत्तर प्रदेशमध्ये निषाद पक्षाचा केवळ एक आमदार आहे. तर संजय निषाद यांचा मुलगा प्रवीण हे भाजपचे खासदार आहे. संजय निषाद यांनी नुकतीच नड्डा यांची भेट घेत आगामी निवडणुकीसाठी 160 जागांची मागणी केली होती. जवळपास 70 जागांवर निषाद समाजाचे मतदार 75 हजारांहून अधिक आहेत. मला उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यास त्याचा फायदा भाजपलाच होईल, असे निषाद म्हणाले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख