गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास NIA कडे; अमित शहांचे आदेश

गुजरातमधील मुंद्रा बंदरावर काही दिवसांपूर्वी तब्बल 21 हजार कोटी रुपयांचे 2 हजार 988 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास NIA कडे; अमित शहांचे आदेश
NIA

नवी दिल्ली : देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्यात आला आहे. केंद्रीय गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर काही दिवसांपूर्वी तब्बल 21 हजार कोटी रुपयांचे 2 हजार 988 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास NIA कडं देण्यात आल्यानं दहशतवादी कारवाईच्या अनुषंगाने याचा तपास केला जाणार आहे.

'एनआयए'ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरामतमधील मुंद्रा बंदरावर जप्त करण्यात आलेल्या 2 हजार 988 किलो ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनआयएने सुरू केला आहे. बुधवारी याबाबत गृह विभागाकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर माचावरम सुधाकरन, दुर्गा पी. व्ही. गोविंदाराजू, राजकुमार पी आणि इतरांविरोधात एनडीपीएस कायदा आणि बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NIA
बिहारमध्ये वादळ : यादव कुटुंबात फूट...तेजप्रताप यादव पक्षातून बाहेर

मुंद्रा हे बंदर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आहे. महसूल गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी बंदरावर छापा टाकण्यात आला होता. यामध्ये सुमारे तीन हजार किलो वजनाचे हेरॉईन हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. देशात एकाच ठिकाणी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. बंदरावर ड्रग्ज घेऊन आलेले जहाज इराणमार्गे अफगाणिस्तानातून आले होते.

जहाजावर टाल्क स्टोन असल्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती. त्यावरील कंटेनरमध्ये टाल्क स्टोनचे तीन थर करून त्याखाली हेरॉईन लपवण्यात आले होते. ही आंतरराष्ट्रीय डॅग्ज तस्करी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्याने तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे एनआयएने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतल्याचे समजते.

दरम्यान, मुंबईत अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाकडून (NCB) मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज तस्कर तसेच सेवन करणाऱ्या अनेकांना अटक केली आहे. नुकतेच अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला एका क्रुझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक करण्यात आली आहे. तसेच मागील दिवसांत मुंबईत मोठ्या प्रमाणावर अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.