शपथविधीच्या तासभर आधी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला दिला होता नकार 

पत्रामध्ये पंतप्रधान पदी नियुक्त करताना त्यात घटनेतील कलमाचा उल्लेख नसल्याचे कारण दिले होते​.
Nepali PM Sher Bahadur Deuba refuses to take oath
Nepali PM Sher Bahadur Deuba refuses to take oath

नवी दिल्ली : नेपाळमधील राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी सायंकाळी नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण शपथविधीच्या तासभर आधीच त्यांनी शपथ घेण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली. राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या पत्रामध्ये पंतप्रधान पदी नियुक्त करताना त्यात घटनेतील कलमाचा उल्लेख नसल्याचे कारण देऊबा यांनी दिले होते. (Nepali PM Sher Bahadur Deuba refuses to take oath)

नेपाळमधील संसद पाच महिन्यांपूर्वी दोन वेळा बरखास्त करण्यात आली होती. हा पेच सर्वोच्च न्यायालयात गेला होता. मागील आठवड्यापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. आठवडाभरापूर्वी निवडणूक आयोगानं मध्यावधी निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यातच न्यायालयाने विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करून पंतप्रधानपदी नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची नियुक्ती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

या आदेशानंतर काळजीवाहू पंतपधान केपी शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार देऊबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. घटनेतील कलम 76(5) नुसार ही नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार शपथविधीसाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रशासनाकडून तयारीही करण्यात आली.

पण शपथविधीच्या तासभर आधीच देऊबा यांनी शपथ घेण्यास नकार दिला. नियुक्तीच्या पत्रामध्ये घटनेतील ज्या कलमानुसार आपली नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचा उल्लेख नसल्याचे ते म्हणाले. या पत्रामध्ये दुरूस्ती झाल्याशिवाय शपथ घेणार नसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर तासाभरात यावर पडदा पडल्यानंतर देऊबा यांनी शपथ घेतली. ते पाचव्यांदा पंतप्रधान झाले आहेत. ते 74 वर्षांचे आहेत. 

अन् देऊबा यांची वाट सुकर झाली

राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी तत्कालीन पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीनुसार 22 मे रोजी सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर 12 नोव्हेंबर व 19 नोव्हेंबरला त्यांनी मध्यावधी निवडणुकांचा प्रस्ताव मांडला. पण नेपाळी काँग्रेसने बरखास्तीला विरोधा करत 146 सदस्यांचे सभागृह पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी केली. न्यायालयानेही राष्ट्राध्यक्षांचा सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवत देऊबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com