राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग अन् वनमंत्री अडचणीत - NCP Minister A K saseendran accused of intervening in molestation case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग अन् वनमंत्री अडचणीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जुलै 2021

वनमंत्री व मुलीच्या वडिलांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. 

तिरूअनंतपुरम : केरळ सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव मंत्री असलेले ए. के. शशींद्रन अडचणीत सापडले आहेत. पक्षातील एका स्थानिक नेत्याच्या मुलीने पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतील एका सदस्याविरूध्द विनयभंगाची तक्रार केली आहे. या प्रकरणात शशींद्रन यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. (NCP Minister A K saseendran accused of intervening in molestation case)

केरळातील कोल्लम जिल्ह्यातील कुंदरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलीने तक्रार दिली आहे. पक्षाचे राज्य कार्यकारिणीतील सदस्य जी. पद्माकरन यांच्याविरुध्द 28 जून रोजी तक्रार देण्यात आली आहे. वडील राष्ट्रवादीत असले तरी ही मुलगी भाजपची कार्यकर्ता आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही कर्तृत्ववान, परखड नेते : चंद्रकांत पाटील

पिडीतेच्या तक्रारीनुसार, पद्माकरन यांनी 6 मार्च रोजी त्यांच्या दुकानात गेल्यानंतर वाईट भावनेतून हात आपला हात पकडला. मागील वर्षी आपण भाजपच्या तिकीटावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती. भाजपने त्यासाठी पैसे दिले असतील तर आम्हीही देतो, असे ते म्हणाले होते. त्यानंतरही पोलिसांत तक्रार करणार नव्हते. पण त्यांनी सोशल मीडियातूनही आपल्याविषयी अपमानास्पद विधानं केल्यानं तक्रार केल्याचे पिडीत मुलीने म्हटलं आहे. 

या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वनमंत्री शशींद्रन व वरकला रविकुमार यांच्या सांगण्यावरून आपल्याला फोन करत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शशींद्रन यांनी आपल्या वडिलांना स्वत: फोन करून हे प्रकरण योग्यप्रकारे मिटवण्यास सांगितल्याचा आरोप मुलीने केला आहे. 

हेही वाचा : राजीनाम्याची मागणी सुरू असताना येडियुरप्पा म्हणाले, मोदी, शहा अन् नड्डांचे माझ्यावर विशेष प्रेम!

शशींद्रन व मुलीच्या वडिलांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राज्यात हे प्रकरण गाजू लागले आहे. दरम्यान, शशींद्रन यांनी मुलीची तक्रार विनयभंगाची असल्याबाबत आपल्याला माहिती नव्हते. पक्षातील दोन कार्यकर्त्यांमधील हा वाद असल्याचे आपल्याला वाटले होते. विनयभंगाबाबत समजल्यानंतर पुन्हा फोन केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

काँग्रेस व भाजपने शशींद्रन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेते त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी कुठलंही गैरकृत्य केलं नसल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. शशींद्रन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पीडितेवर दबाव टाकण्याचा आरोप केल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकारी नाही, असे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतिशन म्हणाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुदेंद्रन यांनीही शशींद्रन यांच्यावर करत राजीनाम्याची मागणी केली.

काँग्रेसने विधानसभेतही हा मुद्दा उचलून धरला आहे. गुरूवारी युडीएफच्या आमदारांनी विधानसभेतून वॉकआऊट केले. पिडीत मुलीनेही शशींद्रन यांच्याविरोधात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शशींद्रन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख